बर्ड फ्लू म्हणजे फक्त कोंबड्याचं मरण आहे का?: शरद निंबाळकर
X
देशात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि केरळ यासारख्या 13 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने शेतकऱ्यांना मोठा सहन करावा लागला आहे.
या 13 राज्यातील कावळे, स्थलांतरीत पक्षी आणि वन्य पक्षी यांच्यातही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक वन्य पक्षांचा मृत्यू झाला आहे. ज्या भागामध्ये बर्ड फ्लू आढळला त्या भागातील शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या सरकार नष्ट करत आहे. असं पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने म्हटले आहे.
कसा होतो बर्ड फ्लू?
बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा (H5N1) या विषाणू ने होतो. सामान्य भाषेत यालाच आपण बर्ड फ्लू असं म्हणतो. H5N1 हा अत्यंत (बर्ड फ्लू एव्हियन इन्फ्लूएंजा) हा अत्यंत संसर्गजन्य आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं. माणसापर्यंत हा व्हायरस कसा पसरतो...?
बर्ड फ्लू झालेल्या पक्षाच्या संपर्कात माणूस आल्यास त्याला हा व्हायरस होतो. माणसाला वेळेत उपचार न मिळाल्यास माणसाचा देखील मृत्यू होऊ शकतो. साधारण घर जर कोंबड्याच्या खुराड्याजवळ (पोल्ट्री फार्मजवळ) असेल तर हा आजार पसरण्याची भीती असते.
काय आहेत लक्षणं?
- साधारण पणे हा विषाणू माणसाच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो
- उलटी आल्यासारखे वाटत राहणे
- नाक गळणे
- डोकेदुखी
- ताप येणे
ही बर्ड फ्लूची लक्षण आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यानं विदर्भासह मराठवाड्यातील पोल्ट्री इंडस्ट्रीवर मोठा परिणाण झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच बर्ड फ्लू हा कोरोना महामारी नंतर आल्याने लोकांच्या मनात याबद्दल मोठी दहशत असल्याचं दिसून येतं आहे.
शेतकऱ्याचं आर्थित गणित कोसळलं...
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय हे शेतीला जोडधंदे म्हणून ओळखले जातात. सध्या दोनही व्यवसाय अडचणीतच आहेत. मात्र, बर्ड फ्लूने पोल्ट्री व्यवसाय अधिकच अडचणीत आला आहे. ज्या भागात बर्ड फ्लू झाला आहे. त्या भागातील लोकांनी चिकन खाणे बंद केलेच आहे. मात्र, ज्या भागात बर्ड फ्लूचा प्रसार झालेला नाही. अशा भागातील लोकांनी देखील चिकन खाणं बंद केलं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्वच पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. महाराष्ट्रात चिकन आणि अंड्याची मागणी घटली आहे.
पक्षांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याने चिकन आणि अंडी खाल्ल्याने आपल्यालाही हा रोग होऊ शकतो. असा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झाल्याने चिकन व अंड्याचे दर दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत.
8 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जवळपास 38 हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 700 बदकांचा समावेश आहे.
साताऱ्या मधील मांड गावांमध्ये काही मृत कोंबड्यांना चाचणीसाठी भोपाळला पाठवले असता, त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे चिकन आणि अंडी यांना व्यवस्थित उकळून खाल्ल्याने माणसावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे.
या संदर्भात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले...
नागपुरात दररोज ८ लाख अंड्याचा खप होतो, विदर्भामध्ये १६ ते २० लाख अंड्यांचा खप होतो. त्याच प्रमाणे १ लाख पक्षांचं चिकन विदर्भामध्ये खाल्लं जातं. या आकडेवारीच्या निम्म्या पेक्षा ही कमी खप होत असताना आता ही इंडस्ट्री पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. त्यामुळे आता सरकारने या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच सामान्य लोकांमध्ये जागरुकता पसरवणे गरजेचे आहे. असं मत निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.
कोंबड्या मरण्याचं प्रमाण सर्वाधिक कुठं आहे?
ज्या ठिकाणी सायन्टिफिक पोल्ट्रीची संसाधने आहेत. त्या ठिकाणी कोंबड्या कमी प्रमाणात मरत आहेत. मात्र ज्या ठिकाणी संसाधने नाहीत. त्या ठिकाणी मृत कोंबड्यांचे प्रमाण अधिकाधिक वाढत आहे.
सरकारची मदत...
सरकारने नुकतेच एक कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान पोल्ट्री इंडस्ट्रीसाठी मंजूर केले असल्याने पोल्ट्री चालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ही मदत पुरेशी ठरणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मंत्री सुनिल केदार यांनी याबद्दल माहिती देत असताना, 6 आठवड्याच्या पक्षासाठी 20 रुपये, 6 आठवड्यांपेक्षा मोठ्या पक्षासाठी 70 रुपये व त्यापेक्षा मोठ्या पक्षांसाठी 90 रुपये तसेच प्रत्येक अंडी 3 रुपये अशा स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे .
पोल्ट्री इंडस्ट्रीला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी सामाजिक, शासकीय आणि शास्त्रीय विभागांनी जागरूकता करणं गरजेचं आहे. असं मत त्यांनी शरद निंबाळकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं.