कोवीशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 8 ते 12 आठवड्यांचे अंतर असावे - WHO
X
कोरोनावरील लसीकरण भारतात वेगाने होत आहे, पण आता कोरोनावरील कोवीशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये किमान 8 ते 12 आठवड्यांचे अंतर असले पाहिजे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ.सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केले आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होण्याआधी दुसऱ्या लाटेशी लढा द्यावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संपूर्ण लॉकडाऊनचे परिणाम खूप भयंकर असतात, त्यामुळे असे लॉकडाऊन नको असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनावरील कोवीशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 8 ते 12 आठवड्यांचे अंतर पाहिजे असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पण लहान मुलांच्या लसीकरणाची शिफारस अजून करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रापाल सिंग यांनीही आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त प्रतिक्रिया देताना कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आणखी वेगाने झाले पाहिजे असे म्हटले आहे. भारतात सध्या दिवसाला 26 लाख नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर यापेक्षा जास्त म्हणजे दिवसाला 30 लाख लोकांचे अमेरिकेत लसीकरण केले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.