HIV व्हायरस संपला नाही, तसा कोरोना व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता...
X
जगभरात थैमान घालणारा आणि संपूर्ण जगाला थांबवणारा कोरोना व्हायरस कधी संपणार. कोरोनावर मात करण्यासाठी लस कधी विकसीत होणार. पुन्हा जगभरातील सर्व व्यवहार सुरळीत कधी होणार? कोरोनाची साथ आटोक्यात कधी येणार? असे प्रश्न सद्य स्थितीत सामान्यांना पडले आहेत.
मात्र, कोरोना कधीच न संपण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय असलेल्या जिनेव्हामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. माईक रायन यांनी ही भीती व्यक्त केली आहे.
याबाबत प्रश्नांना उत्तर देताना डॉ. माईक रायन म्हणाले, ‘हा एक नवीन व्हायरस आहे. ज्याचा मनुष्याला संसर्ग होतोय. त्यामुळे ही परिस्थिती कधी संपेल, आपण यातून कधी बाहेर येवू. यावर भाष्य करणं शक्य होणार नाही. सद्य स्थितीत कोरोनामुळे संसर्ग झालेल्यांची जगभरात संख्या अजूनही कमी आहे. हा व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. एचआयव्ही देखील पूर्णत: गेला नाही. एचआयव्ही विरोधात लढण्यासाठी आपण उपचार पद्धती विकसीत केली. त्यामुळे लोकांमध्ये आता याबाबत भीती कमी झालीये.
भारतात सद्य स्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ हजारावर पोहोचलीये. तर, अडीच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने २५ हजाराचा आकडा पार केलाय.
‘मी कोरोना आणि एचआयव्ही या दोन आजारांची तुलना करत नाही. पण, आपल्याला परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कोरोनाविरोधात प्रभावी लस तयार झाली तर आपण ही लस ज्यांना याची गरज आहे त्यांना देवू शकतो. ज्यामुळे आपण कोरोनाचा संपूर्ण नाश करू शकतो,' असं डॉ. रायन पुढे म्हणाले.
जगभरात आत्तापर्यंत ४३ लाख लोक कोरोनाग्रस्त झालेत, तर ३ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
डॉ रायन पुढे म्हणाले, मोठ्या संख्येने केसेस असताना जर आपण लॉकडाऊन उघडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग होवू शकतो. लोकांमध्ये याचा संसर्ग पसरला, आणि व्हायरस शोधून काढण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान नसेल. तर, कुठे चूक झाली. हे कळून येण्यासाठी काही महिने लागतील. तेव्हा पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही.
त्यामुळे आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था यांच्यावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतासह जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन हळुहळू उघडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन उघडतानाही हाय अलर्ट राहण्याचा सल्ला सर्व देशांना दिलाय.