Home > News Update > परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा: मुख्यमंत्री

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा: मुख्यमंत्री

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा: मुख्यमंत्री
X

वांद्रे इथं परराज्यातील शेकडो मजूर आणि कामगार रस्त्यावर आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लाखो लोकांसाठी केंद्राकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ल़ॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये असलेले स्थलांतरीत मजूर अकडून पडले आहेत. महाराष्ट्रातही लाखो स्थलांतरीत मजूर आहेत. त्यांची सध्या सोय केली गेली असली तर त्यांना घरी जाण्याची इच्छा असल्याने केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १५ मे पर्यंत विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा केंद्राचा अंदाज असेल तर आता वेळेचा योग्य वापर करत परराज्यातील अडकलेल्या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच एप्रिल महिना अखेरपर्यंत यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार कराव्या अशी मागणी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. परराज्याप्रमाणेच राज्यातील नागरिकही जिल्ह्या जिल्ह्यात अडकले आहेत त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुरुवातीपासून ते घरी पोहोचेपर्यंत या कामगार आण् मंजुरांचे निरीक्षण करुन त्यांना तिथे क्वारंटाईन करता येईल, अशी व्यवस्था करून त्यांना पाठवण्याबाबत विचार करावा असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Updated : 22 April 2020 6:16 AM IST
Next Story
Share it
Top