Home > हेल्थ > कॅन्सर उपचार व रक्तपेशी

कॅन्सर उपचार व रक्तपेशी

कॅन्सर उपचार व रक्तपेशी
X

मानवी शरीरात साधारणपणे ५ लिटर रक्त असते. त्यामध्ये रक्त द्रव व पांढऱ्या पेशी (WBC), तांबड्या पेशी (RBC), प्लेटलेट्स/ बिबीका (platelets) व इतर महत्वाची प्रथिने, एन्झाईम्स, संप्रेरके असतात. रक्तामध्ये तांबड्या पेशीचे प्रमाण सर्वाधिक असून त्यामध्ये हेमोग्लोबिन (Hb) घटक असतो. जो प्राणवायू (Oxgen) वाहून नेह्ण्याचे कार्य करतो तसेच त्या रक्त गट देखील ठरवतात. पांढऱ्या पेशी शरीराचे संसर्गजन्य किटाणू/ जीवाणूपासून रक्षण करतात. अकार्यक्षम पेशींना नष्ट करतात.

न्यूट्रोफिल (Neutrophils), लिम्फोसाईट (lymphocytes), बेसोफील (Basophils), इओसिनोफ़िल (Eosinophils), मोनोसाईट (Monocytes) आदी प्रकारच्या पांढऱ्या पेशी असतात. प्लेटलेट्स/ बिबीका (platelets) मुळे रक्ताची गुठूळी होऊन रक्तस्त्राव बंद होतो.

कॅन्सरमध्ये मुख्यतः शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, तसेच केमोथेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती वापरल्या जातात. रेडीओथेरपी साधारणपणे दीड महिन्यापर्यंत चालते. तसेच रेडीओथेरपी दरम्यान केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने सोबत किंवा दर तीन आठवड्याने दिले जातात. रक्तपेशी हाडाच्या पोकळीत असणाऱ्या मज्जा पेशीपासून बनतात. त्यामुळे त्या भागास रेडीओथेरपीचे उपचार केल्यास रक्तपेशी बनत नाहीत किंवा कमी प्रमाणात बनतात. केमोथेरपी ओषधे अस्तिमज्जा पेशी (bone marrow) ना इजा करतात. त्यामुळे पांढऱ्या पेशी (WBC), तांबड्या पेशी (RBC), प्लेटलेट्स/ बिबीका (platelets) कमी होऊ शकतात.

कॅन्सरमुळे भूक कमी होते. अन्नावरची वासना उडते. वजन कमी होते आणि पर्यायाने रक्त कमी बनते. त्यामुळे कॅन्सरचे उपचार चालू असताना बऱ्याच वेळा रक्त तपासणी केली जाते. रक्त कमी असल्या कारणाने उपचारामध्ये अनियमिता येते. रुग्णांनी खालील गोष्टी रेपोर्ट मध्ये पहिल्या पाहिजेत.

रक्त पेशी कमी झाल्यास किंवा कमी होऊ नये म्हणून घ्यावयाचा आहार:

हेमोग्लोबिन (Hb) : अ‍ॅनिमिया मुख्यतः रक्तस्त्राव होणे, लोह कमी होणे, विटामिन बी १२ कमी होणे किंवा फोलिक असिड कमी असणे अशा अनेक कारणांनी होतो. अ‍ॅनिमियामुळे अशक्तपणा / थकवा येणे, झोप येणे, पाय आणि हातावर सूज येणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी त्रास होतात.

लोहपेशीला प्राणवायूचा योग्य पुरवठा करण्याचे काम लोह खनिज करते. कर्करोगासारख्या आजाराशी मुकाबला करण्याची शक्‍ती शरीराला पुरवण्याचे काम लोह करते. पोटॅशियमसह लोहाचा पुरवठा व्हावा यासाठी गुळ, शेंगदाणे, बेदाणे, करवंदे, जांभळे, सफरचंद, कांदा, पालक, मुळा, तीळ जवस हे पदार्थ आहारात असावेत. लोह फारच कमी असल्यास इंजेक्शन किंवा गोळ्याच्या रुपात दिली जातात.

विटामिन बी १२ : पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ--यातून मिळते.

फॉलिक ऍसिड : लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते.) गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.

पांढऱ्या पेशी (WBC) : कॅन्सर उपचार किंवा किमोथेरेपी उपचारादरम्यान पांढऱ्या पेशी कमी होणे अतिशय गंभीर गोष्ट असते. शरीराची प्रतिकार शक्ती पांढऱ्या पेशींच्या संख्येवर अवलंबून असते. कॅन्सर रोगामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी असते तसेच पांढऱ्या पेशी कमी झाल्यास ती आणखीनच खलावते. त्यामुळे रुग्णाला इन्फेक्शन होऊन ते शरीरात पसरू शकते. फेब्राइल न्यूट्रोपेनिया अतिशय गंभीरपणे घेण्याची गोष्ट असून यामध्ये ताप येणे, जुलाब होणे, थकवा येणे इत्यादी लक्षणे आढळतात. तातडीने रक्त तपासणी करून आपल्या डॉक्टरला भेटावे. रक्त पेशी फारच कमी असल्यास शक्यतो रुग्णालयात भरती होऊन उपचार घेण्यास प्राधान्य दयावे. याच्या उपचारासाठी प्रतीजैविके (antibiotics), क्रोसिन (crocin) व पांढऱ्या पेशी वाढविणारी इंजेक्शन (gcsf, peggcsf) दिली जातात. दर किमोथेरपी उपचारावेळी रक्त पेशी कमी होत असल्यास, किमोथेरपी ओषधे बदलून दयावी किंवा त्यांची मात्रा कमी करावी.

बिबीका (platelets) : प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात, इतर कुठलेही उपाय किंवा गोळ्या, ओषधी देखील प्लेटलेट्स वाढवतात असे खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाही. आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. डाळिंब, पपई, भोपळा, गुळवेल, आवळा, पालक आणि बीट इत्यादी पदार्थ खाल्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

1. जखम होऊन रक्तस्त्राव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.

2. अस्पिरीन/कॉल्ड ड्वक सारखी ओषधी घेऊ नये.

3. लसूण खावू नये

4. अधीक श्रम करू नये.

5. त्वरित डॉक्टर चा सल्ला घ्यावा

(डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी आहार तज्ञ यांच्या कडून आहार लिहून घ्यावा)

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 21 July 2017 8:06 PM IST
Next Story
Share it
Top