दिनचर्या कशी असावी - भाग २
X
आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे.
''ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:''
ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीय वेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासीत, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.
अभ्यंग -
संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.
आहार -
सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नी चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. यातही म्हातारपणी अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे आहार हा सर्व गुणसंपन्न मिळू शकत नाही. तसेच स्त्रियांना काटकसरी धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते. काय करायचे जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून आपोआप व्यक्त होणाऱ्या इच्छा दडपल्या जातात. तसेच म्हातारपणी एकभूक्त म्हणजे एकदाच जेवून राहावे इ. दृढसमज असतात, त्यासाठी आयुर्वेद सांगतो निसर्गाला शरण जा. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, भूक नसेल तर पाणीसुध्दा पिवू नका.
सूर्यनमस्कार -
भारतीय संस्कृतीत सूर्य ही तेजाची देवता मानली जाते. सूर्य सर्व प्रकारच्या शक्तीचे उगमस्थान आहे. सूर्य जीवनदाता आहे. म्हणुन हजारो वर्षांपासुन सूर्योपासना केली जाते. सूर्य नमस्काराचे मूळ संस्कृत नाव 'सांष्टांग सूर्य नमस्कार' असे आहे. त्याचा अर्थ शरीराच्या आठ अंगांनी सूर्यास वंदन करणे असा आहे. सूर्य नमस्कार हा शरीर, बुध्दी आणि मन या तिघांवरही नियंत्रण ठेवणारा, त्यातुन सुप्त क्षमता वाढवणारा आणि जागृत झालेली शक्ती सत्प्रवृत्त मार्गाला लावणारा व्यायाम आहे. रोज किमान १३ सूर्य नमस्कार घालावे.
सूर्याची बारा नावेः-
ओम मित्राय नमः
ओम रवये नमः
ओम सूर्याय नमः
ओम भानवे नमः
ओम खगाय नमः
ओम पूष्णे नमः
ओम हिरण्यगर्भाय नमः
ओम मरीचये नमः
ओम आदित्याय नमः
ओम सवित्रे नमः
ओम अर्काय नमः
ओम भास्कराय नमः
ओम श्री सूर्य नारायणाय नमः