भारत की इंडिया, देशाचं नाव कसं पडलं? सरकारलाच नाही माहीत
X
आपल्या देशाचं नाव नेमकं भारत, इंडिया की हिंदूस्थान यावरून नेहमी वाद होत असतात. मात्र देशाचं नाव भारत किंवा इंडिया नेमकं कसं पडलं? हेच सरकारला माहीती नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
देशाचं नाव भारत की इंडिया यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. पण देशाचं भारत हे नाव कसं पडलं? देशाचं इंडिया हे नाव कसं पडलं? यासंदर्भात सरकारलाच माहिती नसल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात समोर आलंय.
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी माहिती अधिकारात देशाचं नाव भारत कसं पडलं? देशाला भारत नाव देण्याचा प्रस्ताव कुणी दिला होता? यासंदर्भात ठराव कुणी मांडला? याविषयी माहिती मागवली होती. मात्र हे सरकारलाच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
रवींद्र आंबेकर यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने याची माहिती गृह मंत्रालयाकडे असण्याची शक्यता वर्तवली. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकाराचा अर्ज गृह मंत्रालयाकडे हस्तांतरीत केला
''देशाचं नाव भारत किंवा इंडिया कसं पडलं, नामकरणाचा प्रस्ताव कोणी मांडला होता या संदर्भातील या माहिती अधिकारावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने ही माहिती आपल्याकडे नसल्याचं सांगितलं आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात उत्तर देतांना म्हटले की, यासंदर्भातील माहिती CPIO च्या रेकॉर्डमध्ये नाही. त्यामुळे यासंदर्भातील माहिती ही कायदा मंत्रालयाकडे असू शकते. त्यामुळे आम्ही हा अर्ज कायदा मंत्रालयाकडे हस्तांतरीत करत आहोत.''
या मुद्द्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, पंतप्रधान कार्यालय असो वा गृह मंत्रालय यांनाच देशाचं नाव कसं पडलं याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय गृह मंत्रालयाकडे बोट दाखवतंय. तर गृह मंत्रालय हे कायदा मंत्रालयाकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे.