सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचे सत्य, पोलिसांचे फॅक्ट चेक
X
सध्या राज्यात सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पण अनेक ठिकाणी लोक दुकाने बंद करत नसल्याने पोलीस आणि अधिकारी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत आहे. पण याच दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी कोवीडच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकांना मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यात एक व्यक्ती काठी घेऊन दुकानदारांना मारत असल्याचे दिसते आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूर पोलिसांनी तातडीने या व्हिडिओचे फॅक्ट चेक केले आणि ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले. पोलिसांनी यात म्हटले आहे की, लातूर कलेक्टर COVID-19 अंमलबजावणीसाठी मारहाण करत असल्याचा व्हायरल व्हिडिओ हा लातूर कलेक्टर यांचा नसून फेक आहे. तो मध्यप्रदेश मधील जुना व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूर कलेक्टर covid-19 अंमलबजावणी साठी मारहाण करीत असल्याचा #viral झालेला विडिओ हा लातूर कलेक्टर यांचा नसून फेक आहे. तो मध्यप्रदेश मधला जुना विडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. pic.twitter.com/cUDD9KLFas
— Latur police (@LaturPolice) April 8, 2021
सध्या सोशल मीडियावर असे खोटे व्हिडिओ, मेसेजेस व्हायरल होत असतात, पण ते फॉर्वर्ड करताना त्याची सत्यता पडताळणे आवश्यक असते.