Zee News च्या सुधीर चौधरी यांच्यावर हल्ला केल्याच्या दाव्यामागचं सत्य काय?
X
सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहेत. दोन फोटो एकत्रित करून हा फोटो व्हायरल केला जात आहे. तसेच असा दावा केला जात आहे की, झी न्यूजच्या नोएडा येथे असलेल्या ऑफिसची तोडफोड करून चॅनेलचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एका बाजूला ऑफिसमध्ये तोडफोड केल्याचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला सुधीर चौधरी यांच्या नाकावर बँडेड लावल्याचा फोटो आहे.
हा फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, फेसबुकवर हा फोटो शेअर करताना असं लिहिलं जात आहे की, "सुधीर चौधरीवर झालेल्या या हल्ल्याचा आम्ही त्याच पद्धतीने निषेध करतो ज्यापद्धतीने झी न्यूजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा निषेध केला जातो."
तसेच या एकत्रित केलेल्या फोटोवर एक मजकूर सुद्धा लिहिण्यात आला आहे. मजकुरामध्ये लिहिण्यात आलं आहे - "झी न्यूज नोएडा कार्यालयात सुधीर चौधरींवर अंधाधूंदपणे चप्पल बुटांनी मारहाण. मारता मारता ८ शूज आणि १२ चप्पल तुटल्या आहेत. आम्हाला शूज - चप्पल तुटल्याबद्दल खूप खंत वाटत आहे.
हा फोटो एका पेजवरूनसुद्धा कोणताही दावा न करता शेअर केला गेला आहे.
काय आहे सत्य...?
दरम्यान, दोनही फोटोंचं रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा दावा खोटा असल्याचं आम्हाला आढळून आलं.
रिव्हर्स इमेजद्वारे, आम्हाला 2019 मध्ये Samachar4media या वेबसाईटवर प्रकाशित केलेला एक रिपोर्ट सापडला. रिपोर्टनुसार, चौधरी यांचा मुंबई दौऱ्यादरम्यान एक किरकोळ अपघात झाला. ज्यामुळे त्यांच्या नाकाला दुखापत झाली. तसेच चौधरी यांच्या फेसबुकवर सुद्धा त्यांचा एक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये त्यांनी या दुखापतीविषयी सांगितलं आहे. हा व्हिडिओ त्यांनी ११ जुलै २०१९ रोजी अपलोड केला होता.
या फोटोचं रिव्हर्स इमेज सर्च केले असता आम्हाला तीन वर्षांपूर्वीचा मुंबई लाइव्हचा एक रिपोर्ट सापडला. रिपोर्टनुसार, ही घटना मुंबईची आहे. जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती.
दरम्यान, २०१७ साली ANI ने सुद्धा याबद्दल ट्विट करत वृत्त दिलं होतं.
निष्कर्ष : झी न्यूजच्या नोएडा येथे असलेल्या ऑफिसची तोडफोड करून चॅनेलचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा खोटा आणि भ्रामक आहे.
या संदर्भात बुम लाईव्ह ने फॅक्ट चेक केलं आहे.