Home > Fact Check > Fact Check: सुदर्शन न्यूजने फक्त मुस्लिम आरोपीचेच नाव घेतले का?

Fact Check: सुदर्शन न्यूजने फक्त मुस्लिम आरोपीचेच नाव घेतले का?

Fact Check: सुदर्शन न्यूजने फक्त मुस्लिम आरोपीचेच नाव घेतले का?
X

सुदर्शन न्यूज ने ३ जूनला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे RT-PCR कीट हे न वापरताच सॅम्पल घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. सुदर्शन न्यूजने ट्विट केलेल्या व्हिडिओचं कॅप्शन "वॉर्ड बॉय 'हसन' कोरोना टेस्ट कीटचा वापर न करता तोडून फेकून देत आहे. वास्तविक पाहता व्हिडिओमध्ये एकूण 3 लोक दिसत आहेत. त्यापैकी एक टेस्ट कीट भरत आहे. तर दुसरा व्यक्ती टेस्ट किटच्या ट्यूबवर नाव लिहित आहे आणि तिसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या मागे बसलेला आहे. सुदर्शन न्यूजने यामधील पहिल्या व्यक्तीचं नाव 'हसन' सांगितलं आहे.

सुदर्शन न्यूजचे CMD आणि मुख्य संपादक सुरेश चव्हाण यांनीही हा व्हिडिओ त्या व्यक्तीचं नाव 'हसन' सांगत ट्विट केला आहे. दरम्यान बऱ्याच ट्विटर यूजर्सने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. फेसबुकवरही अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काय आहे सत्य...? द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ३१ मे रोजी उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात चाचणी न करता RT-PCR कीट भरणाऱ्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार या आरोपींमधील लॅब टेक्निशियनचं नाव नितेश कुमार आणि वॉर्ड बॉयचे नाव मोहम्मद हसन अशी आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मुख्य वैद्यकीय अधिकारी (CEO) डॉ. अनुज कुमार यांनी हसन यांना निलंबित केले. त्याचबरोबर त्यांनी नितेशच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी जिल्हा नगरविकास एजन्सी यांना पत्रही लिहिलं आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील महरीपूर गावात मंझरिया प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याची माहिती पीटीआयने (PTI) दिली आहे. PTI च्या रिपोर्टनुसार लॅब टेक्निशियन नितेश कुमार टेस्ट कीट खोलतो. मात्र, वृद्ध व्यक्तीचं सॅम्पल न घेताच तो टेस्ट बंद करतो. सोबत वॉर्ड बॉय हसन फॉर्ममध्ये वृद्ध व्यक्तीचा तपशील भरताना दिसत आहे. बस्तीच्या जिल्हाअधिकाऱ्याने या प्रकरणाबद्दल ट्विट केलं आहे, त्यांच्या ट्विट मध्ये ते म्हणतात - या प्रकरणात 2 जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून त्वरित कारवाई करत वार्ड बॉयला निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी अल्ट न्यूजने स्थानिक पत्रकारांशी बातचीत केली असता, या घटनेमागील हेतू अद्याप स्पष्ट झाला नसून एफआयआर नोंदवल्यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जर आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर, एक व्यक्ती (मीडिया रिपोर्टनुसार 'हसन' नाव असणारा) मोकळी ट्यूब उचलतो आणि त्या ट्यूबवर रुग्णाचे नाव लिहून दुसर्‍या व्यक्तीला (मीडिया रिपोर्टनुसार नितेश नाव असणारा) देतो. नितेश ट्यूबमध्ये सॅम्पल नसलेला स्वॅब नमुना टाकतो. याशिवाय व्हिडिओमध्ये नितेशच्या मागे एक व्यक्तीही दिसत आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये किंवा एफआयआरमध्ये त्याच्याविषयी काहीही सांगण्यात आलेलं नाही. SHO सदानंद पांडे यांनी आम्हाला सांगितले की, एफआयआरमध्ये 2 जणांची नावे देण्यात आली आहेत. सदानंद पांडे यांनी सांगितल्यानुसार प्राथमिक तपासणीत अनेक लोकांच्या रिपोर्टसोबत छेडछाड केल्याचं ही समोर आलं आहे. निष्कर्ष: एकूणच सुदर्शन न्यूजने या प्रकरणातील आरोपींपैकी फक्त मुस्लिम वॉर्ड बॉय 'हसन' असे नाव देऊन या वृत्ताला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सुदर्शन न्यूजने या अगोदरही बऱ्याचदा असं केलं आहे. गेल्या महिन्यात बनावट रीमेडेसिव्हिअर इंजेक्शनच्या संदर्भात हिंदू आणि मुस्लिम समाजातील 7 जणांना अटक केली होती. परंतु सोशल मीडियावर केवळ मुस्लिम आरोपींची नावेच शेअर केली गेली होती.

Updated : 8 Jun 2021 9:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top