Fact Check : शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या स्पर्धेत अल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव होते का?
2022 च्या नोबेल पुरस्कारासाठीच्या लोकप्रिय 343 नावांमध्ये अल्ट न्यूजचे फॅक्ट चेकर्स मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांना स्थान मिळाल्याचे वृत्त टाइम्स मासिकाच्या आधारे देण्यात आले होते. पण खरंच मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांना नोबेलसाठी नामांकन मिळाले होते का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे फॅक्ट चेक...
X
2022 चे नोबेल पारितोषक जाहीर झाले. यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार बेलारूसचे अलेस बियालटस्की यांना आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना संयुक्तरित्या जाहीर झाला. मात्र दरम्यानच्या काळात भारतीय फॅक्ट चेकर मोहम्मद झुबैर आणि प्रतिक सिन्हा यांना नोबेलसाठी नामांकन असल्याचे वृत्त टाइम्सच्या रिपोर्टच्या हवाल्याने NDTV ने दिले होते. मात्र मोहम्मद झुबैर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव नोबेलच्या यादीत आल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर NDTV विरोधात खोटी बातमी दिल्याचा दावा करत ट्वीटर ट्रेंड चालवण्यात आला. त्यामुळे अल्ट न्यूजचे फॅक्ट चेकर मोहम्मद झुबैर आणि प्रतिक सिन्हा यांना नोबेलसाठी मानांकन मिळाले होते का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला आहे.
NDTV ने आपल्या रिपोर्टमध्ये फॅक्ट चेकर्स मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांना टाइम्स मासिकाने 2022 च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी लोकप्रिय पर्यायांमध्ये नामांकन दिले असल्याचे वृत्त दिले.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टचा व्हिडीओ सोबत जोडण्यात आला आहे.
Outlook ने नोबेल पारितोषक जाहीर झाल्याचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये बेलारुसचे बियालटस्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल याबरोबरच युक्रेनची मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना संयुक्तरित्या जाहीर झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच मोहम्मद झुबैर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव नोबेलच्या नामांकनामध्ये असल्याचे या सविस्तर वृत्तात म्हटले आहे.
या आऊटलूकच्या वृत्तात म्हटले आहे की,टाइम्स मासिकाने गेल्या आठवड्यात नोबेल पारितोषकासाठी लोकप्रिय असलेल्या नावांची यादी केली होती. या यादीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की, रशियाचे विरधी पक्षनेते अलेक्सी नवल्नी, बेलारुसचे विरोधी पक्षनेते स्विटलाना त्सिखानोक्साया, भारतीय सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदेर आणि भारतीय फॅक्ट चेकर प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांची नावं देण्यात आली होती.
पुढे आऊटलूकमध्ये म्हटले आहे की, 50 वर्षांपासून नोबेल पुरस्काराची समिती कोणत्याही प्रकारचे नामांकन जाहीर करत नाही. त्यामुळे टाइम्स मासिकाचा आधार घेत खोटे वृत्त पसरवले जात आहे.
NDTV ट्वीटरवर ट्रेंड
NDTV ने अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांचे नामांकन नोबेल पुरस्कारासाठी असल्याची हेडिंग केली होती. त्यावरून ट्वीटरवर NDTV ने खोटे वृत्त दिल्याचे म्हटले जात होते.
पत्रकार आणि लेखिका @sagarikaghose यांनीही अल्ट न्यूजचे नाव जगभर पोहचल्याचे म्हटले आहे.
Amused at reactions of some to @zoo_bear and @free_thinker on the Nobel favourites list. 'No its not a nomination.' 'No it's not this, no it's not that.' An avalanche of sheer envy. Fact that @AltNews globally recognised and named as a potential Nobel winner is itself an honour.
— Sagarika Ghose (@sagarikaghose) October 7, 2022
अशा प्रकारे अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांचे नोबेलसाठी नामांकन झाल्याचा दावा करणारे टाइम्सच्या रिपोर्टच्या आधारे ट्वीटरवर मीम्स व्हायरल होत होत्या.
पडताळणी (what is Fact )
NDTV आणि आऊटलूक यांनी टाइम्सच्या हवाल्याने वृत्त दिल्याने मॅक्स महाराष्ट्रने टाइम्समध्ये प्रसिध्द झालेली यादी पाहिली. टाइम्सने 2022 च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठीचे लोकप्रिय लोकांची माहिती दिली. यामध्ये युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह भारतीय फॅक्ट चेकर्स मोहम्मद झुबैर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव आहे. त्याबरोबरच स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचे नावही नोबेल पुरस्कारासाठी असल्याचे म्हटले होते. मात्र टाइम्सने हा रिपोर्ट रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा असल्याचे म्हटले आहे.
मॅक्स महाराष्ट्रने रॉयटर्सच्या रिपोर्टचा शोध घेतला. मात्र तो रिपोर्ट 1 फेब्रुवारी 2022 रोजीचा असल्याचे दिसून आले. या रिपोर्टमध्ये ब्रिटीश नेचर ब्रॉडकास्टर डेव्हिड अॅटनबर्ग, जागतिक आरोग्य संघटना, बेलारुसच्या विरोधी पक्षनेत्या स्वीटलाना त्सिखानोत्स्काया यांच्यासह ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालीची परराष्ट्रमंत्री सिमॉन कॉफे यांची नावं देण्यात आले होते. या यादीत भारतीय फॅक्ट चेकर्स मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांच्या नावांचा समावेश नसल्याचे दिसून आले.
रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये हेच म्हटले आहे की, द नॉर्वेजिएन नोबेल कमिटी कोणी पुरस्कार जिंकला हेच जाहीर करते. गेल्या 50 वर्षांपासून समिती नोबेलच्या निवडींवर कोणतेही भाष्य करत नाही. याबरोबरच नोबेलचे नामांकन आणि नोबेल पुरस्कार न मिळालेल्यांची माहिती नोबेलची समिती गुप्त ठेवते.
मॅक्स महाराष्ट्रने the Noble prize या वेबसाईटला भेट दिली. यामध्ये नोबेल पारितोषकासाठीच्या निवडीची पुर्ण पध्दती सांगितली आहे.
50 वर्षांचा गुप्तता नियम (secrecy Rule of 50 Years )
नोबेल समिती स्वतः नामनिर्देशित व्यक्तींची नावं जाहीर करत नाही. ही नावं प्रसारमाध्यमे आणि ज्यांनी नोबेलसाठी अर्ज केले आहेत त्यांनाही देत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी पुरस्काराची घोषणा होण्यापुर्वी अगाऊ अनुमानाच्या माध्यमातून अंदाज लावले जातात. मात्र ही यादी नोबेल समितीने दिलेली नसते. ती माहिती एकतर नोबेल पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीनी दिली असू शकते किंवा अंदाज असू शकतो. मात्र नोबेल गेल्या 50 वर्षांपासूनची पुरस्कारासाठीची नामांकने किंवा पुरस्कार न मिळालेल्यांची माहिती सार्वजनिक करत नाही. हा नोबेल समितीचा गुप्ततेचा नियम आहे.
निष्कर्ष (Reality)
NDTV आणि Outlook यांनी Times magazine च्या अहवालाच्या आधारे अल्ट न्यूजचे फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या नामांकनामध्ये असल्याचा दावा केला होता. मात्र Times magazine ने Reuters या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टचा आधार घेतला होता. मात्र Times magazine मध्ये प्रसिध्द झालेल्या नावांपैकी काही नावं रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये देण्यात आले होते. मात्र अल्ट न्यूजचे फॅक्ट चेकर्स मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांचे नाव या यादीत नसल्याचे दिसून आले. तसेच नोबेल समिती 50 वर्षापासून नामांकनाची नावं जाहीर करत नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे Times magazine ने दिलेला रिपोर्ट हा अधिकृत नाही. त्यामुळे हे वृत्त खोटे असल्याचे दिसून येत आहे. तसेच या पसरलेल्या वृत्तामुळे मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांच्यावर सोशल मीडियातून चिखलफेक करण्यात आल्याचे दिसून आले.