Home > Fact Check > Fact Check : साधुंना मारहाण झाल्याचा तो व्हिडीओ सांगलीतील घटनेचा नव्हेच!

Fact Check : साधुंना मारहाण झाल्याचा तो व्हिडीओ सांगलीतील घटनेचा नव्हेच!

सांगलीत १३ सप्टेंबर ला मुलं पळवणारी टोळी समजुन काही साधुंना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण हे व्हिडीओ खरंच सांगलीतल्या घटनेचे होते का याचा फॅक्ट चेक करणारा मॅक्स महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट!

Fact Check : साधुंना मारहाण झाल्याचा तो व्हिडीओ सांगलीतील घटनेचा नव्हेच!
X

दोन दिवसांपुर्वी १३ सप्टेंबर ला सांगलीच्या जत मध्ये लवंगा गावात काही साधुंना मुलं पळवणारी टोळी समजुन मारहाण करण्यात आली. बुधवारी १४ सप्टेंबरला ही बातमी सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पसरली. या घटनेचेही काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले. माध्यमांनी देखील याच व्हिडीओंच्या आधारावर बातमी प्रसिध्द केली. पण बातमी लावताना या व्हिडीओंची विश्वासार्हता माध्यमांनी फारशी तपासून घेतलेली दिसत नाही. कारण या व्हिडीओंमध्ये एक व्हायरल होणारा मारहाणीचा व्हिडीओ हा सांगलीतील नसून मध्यप्रदेशातील रायसेन मधील आहे हे सिध्द झाले आहे. मॅक्स महाराष्ट्रने देखील काल ही बातमी लिखित आणि व्हिडीओ स्वरूपात प्रसिध्द केली होती. पण हा मारहाणीचा व्हिडीओ सांगलीशी संबंधित नसल्याने प्रसिध्द केला नव्हता.

सांगलीतल्या या घटनेच्या बातम्या तातडीने सगळीकडे पसरल्या. या घटनेवर बातमी देताना एबीपी न्युजने मारहाणीचा एक व्हिडीओ चालवला ज्यामध्ये साधुंना लाठ्या काठ्यांनी जमाव मारहाण करत आहेत. आणि हा व्हिडीओ सांगलीत लहान मुलांना पळवणाऱ्या साधुंना मारहाण झाली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. (अर्काइव्ह लिंक)

न्युज१८ इंडीया वाहिनीनेदेखील सांगलीच्या घटनेची बातमी करताना अनेक व्हिडीओ चालवल्या आहेत ज्यामध्ये पहिलाच व्हिडीओ साधुंना मारहाण करण्याचा आहे. (अर्काइव्ह लिंक)

टाईम्स नाऊ नवभारत वाहिनीने देखील सांगलीच्या घटनेसंदर्भात हाच व्हिडीओ चालवला. (अर्काइव्ह लिंक)

ज्या पध्दतीने ही बातमी पसरत गेली अनेक माध्यम समुहांनी हा व्हिडीओ चालवला आहे. त्यामध्ये आज तक, रिपब्लिक लाईव्ह, न्युज १८ लोकमत, RSS चं मुखपत्र ऑर्गेनाइज़र वीकली, झी सलाम, महाराष्ट्र टाइम्स, इंडिया टीवी हिन्दी, भारत 24, अमर उजाला, राइटविंग वेबसाइट ऑप इंडिया या माध्यमांचा समावेश आहे.

नेमकं सत्य काय आहे?

पण सत्य शोधायला गेलो तर वेगळंच आहे. सगळीकडे चालवण्यात आलेला हा व्हिडीओ सांगलीतील घटनेचा नसुन मध्यप्रदेशमधील रायसेनमधला आहे. खरं तर या व्हिडीओमध्य़े घडलेली घटना ही सांगलीतील नाही आणि व्हिडीओत दिसणाऱ्या साधुंना मुलं पळवण्याच्या संशयावरून मारलंही नव्हतं. IBC4 या वृत्तवाहिनीने ८ ऑगस्ट २०२२ ला ही बातमी प्रसिध्द केली होती त्यांच्या बातमीनुसार या व्हिडीओत मार खाणार लोक हे साधुच्या वेशात चोरी करायला आले होते. त्यामुळे गावकऱ्य़ांनी त्य़ांना बेदम मारहाण केली होती.

नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने देखील घटनेची तपशीलवार बातमी ७ ऑगस्टच्या अंकात प्रसिध्द केली होती. बातमीनुसार, रायसेन जिल्ह्यातील मंडीदीप पोलीस स्टेशन हद्दीतील पालोहा येथे काही साधूंनी गरीब महिलेला लुटले होते. साधूच्या वेशात आलेल्या या लोकांनी महिलेच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम हिसकावून नेली. नंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते पालोहाला लागून असलेल्या पिपलिया गज्जू गावात राहत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर लोकांनी या साधूंना बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी मंडईदीप पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हे आरोपी यूपीमधील चित्रकूटचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे या बातमीत म्हटले आहे.

फॅक्ट चेक : ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील पलोहा गावातील आहे. तेथे साधूच्या वेशात हात साफ करून चोरी करण्यासाठी आलेल्या लोकांना गावातील लोकांनी बेदम मारहाण केली होती. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील साधूंना मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण केल्याचा व्हिडीओ असल्याचं विविघ माध्यम समुहांनी सांगितलं आहे.

Updated : 15 Sept 2022 5:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top