Fact Check:पाकिस्तानी अधिकाऱ्याने बालकोटमध्ये ३०० दहशतवादी ठार झाल्याचे खरचं कबूल केलयं का?
X
भारताने बालकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाल्याचे पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली म्हणाले असा दावा केला होता. परंतु हा दावा खोटा असून यामागील सत्यता फॅक्ट चेकमधून पुढे आली आहे.
व्हायरल पोस्ट्स :
बालाकोट एयर स्ट्राइक में मारे गए थे 300 आतंकी, पाकिस्तान के पूर्व राजनयिक ने किया खुलासा
Former Pak diplomat admits 300 casualties in Balakot airstrike by इंडिया
मागील काही दिवसांपूर्वी ANI या वृत्त संस्थेने एका व्हिडिओच्या आधारे पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी भारताच्या बालकोट येथील हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी मारले गेले असल्याचे मान्य केलं असल्याची बातमी दिली होती. एएनआय, रिपब्लिक, टाइम्स ऑफ इंडिया, मनीकंट्रोल, डब्ल्यूआयओएन, हिंदुस्तान टाईम्स, एनई नाऊ, ओडिशा टीव्ही, जागरण, स्वराज्य, लोकमत, वनइंडिया, डेक्कन हेराल्ड, बिझिनेस टुडे, लाइव्हमिंट, डीएनए, द क्विंट, न्यूज 18 इंडिया, एचडब्ल्यू न्यूज, इंडिया टुडे, सीएनबीसी टीव्ही 18, एबीपी न्यूज, एनडीटीव्ही, इंडिया टीव्ही य़ांनी या बातम्या प्रसिध्द केल्या होत्या.
मॅक्स महाराष्ट्रानं केलेल्या फॅक्ट चेकमध्ये ही बातमी चुकीची असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानच्या 'हम न्यूज' या वाहिनीवरील 'अजेंडा पाकिस्तान' या कार्यक्रमातील हा व्हिडिओ यूट्यूबवरून प्रसारित करण्यात आला होता. परंतु, या व्हिडिओमध्ये बदल करून तो सोशल मीडियावर वापरण्यात आल्याचंही समोर आलंय.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हा हवाई हल्ला झाला असला, तरी तो पुलवामाचा बदला नसल्याचे भारताने आवर्जून सांगितले होते. जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला. या संघटनेने यापूर्वीही देशात कारवाया केल्या असून, पाकमध्ये ती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असते. याद्वारे ती भारतात कारवाया करणार असल्याची माहिती असल्याने त्या रोखण्यासाठी बालाकोट येथे प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची भूमिका भारताने तेव्हाच म्हणजे २६ फेब्रुवारीलाच स्पष्ट केली. बालाकोटजवळच्या टेकड्यांवरील जैश-ए-महंमदचे तळ लक्ष्य करून भारताने हवाई हल्ले केले. एकूण सहा लक्ष्ये निश्चित केली होती. त्यांपैकी पाच लक्ष्यांचा अचूक वेध घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ पाच लक्ष्यांवर शस्त्रास्त्रे यशस्वीपणे डागली गेली. या कारवाईसाठी हवाई दलाने कमालीची गुप्तता पाळली. मोहिमेची काटेकोर आखणी केली आणि अतिशय चपळाईने कारवाई घडवून आणली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताबारेषा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हवाई हल्ला करून विमाने मायदेशी सुखरूप परत आणणे हेच मोठे यश आहे.
मात्र, लक्ष्यभेदही तितकाच महत्त्वाचा. त्यातही यश आल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे. अशा हल्ल्यांनंतर युद्ध रंगते ते प्रचाराचे; प्रपोगंडाचे. भारताने आपल्या हद्दीत हवाई हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानने लगेच दिली; किंबहुना या हल्ल्याचे पहिले वृत्तही पाकिस्तान लष्कराने दिले. मात्र, या हल्ल्याने आपले काही नुकसान झाले नसल्याचा दावाही पाकने केला आणि तो खरा ठरवण्यासाठी जगातील पत्रकारांना बालाकोट येथे नेण्याची तयारीही दर्शविली. भारताचा हवाई हल्ला परिणामशून्य ठरल्याचे कथन पाकिस्तानसाठी अत्यावश्यक होते आणि त्याने अतिशय जोरकसपणे हा प्रचार केला. भारताने पुरावे दिल्यानंतरही पाकने तो कायम ठेवला. इतकेच नव्हे तर प्रचारात आघाडीही घेतली. यामुळे, भारतातही हल्ल्याच्या यशावर प्रश्न विचारले जाऊ लागले.
१७ व्या लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर दीर्घकालीन परिणाम झाले . उरीवरील दहशतवादी हल्ल्यापाठोपाठ केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर त्याला माध्यमांत मिळालेली प्रसिद्धी, याच दरम्यान प्रदर्शित झालेला त्यावर आधारित चित्रपट आणि यामुळं बनलेलं 'आत्यंतिक राष्ट्रवादी' वातावरण पाहता पुलवामामधील हल्ल्याला प्रतिउत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा सर्व भारतीयांना होती. ही अपेक्षा खरी ठरवताना २६ फेब्रुवारीच्या पहाटे भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून थेट पाकिस्तानात घुसून बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीरची राजधानी) येथील दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले. भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पाकिस्तानातील बालकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटीतील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भल्या पहाटे केलेल्या या कारवाईत हवाई दलाच्या वैमानिकांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. गुप्तचर विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. याची माहिती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख बिपिन रावत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ, नौदल प्रमुख सुनील लांबा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, यांच्यासह गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुखांना या कारवाईची माहिती होती असं सांगण्यात आलं होतं.
हवाई दलाची कामगिरी यशस्वी झाल्याची माहिती अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत दिली. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं सुरवातीला डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं होतं.. भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान झाले आहे,' अशी माहिती डोवाल यांनी दिली होती.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय मंत्रालयानं जारी केलेल्या माहीतीनुसार भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी हेरखात्याने दिलेल्या माहीतीवर आधारित हा पूर्वनिश्चित हल्ला (pre-emptive strike) होता. याला प्रतिउत्तर म्हणून २० पाकिस्तानी विमानांनी हवाई हद्दीत घुसायचा प्रयत्न केला. पण सजग भारतीय हवाई दलाने हा डाव हाणून पाडला. यावेळेस उडालेल्या हवाई चकमकीत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे 'एफ-१६' विमान पाडले, मात्र हे करत असताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं 'मिग-२१ बायसन' विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलेपुढे त्यांची सहीसलामत सुटका झाली. या सगळ्याला माध्यमांतून खूप प्रसिद्धी मिळाली. याचा परिणाम असा झालं की 'चौकीदारही चोर है!' हा मुद्दा बाजूला पडून 'सर्जिकल स्ट्राईक' आणि जवानांच्या नावानं मतं मागितली गेली.
निष्कर्षः नुकतचं रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीच्या व्हाट्सअप चाट मधून बालाकोट हल्ल्याची त्याला कल्पना असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांचा व्हिडीओ फेरफार करुन एएनआय संस्थेने प्रसारीत केला. एएनआयही वृत्तसंस्था भाजपची प्रचारसंस्था म्हणुन ओळखली जात आहे. काही वृत्तसंस्था वगळता सर्व वृत्तसंस्थांनी पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी भारताच्या बालकोट येथील हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी मारले गेले असल्याचे मान्य केल्याची बातमी चुकीची असल्याचं मान्य करुन संकेतस्थळांवरुन काढून टाकली आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या पाहणीत हा दावा खोटा ठरला आहे.