Home > Fact Check > Fact Check: 2014 मध्ये ''देश पुन्हा स्वतंत्र'' झाला सामनाने खरंच असं वृत्त दिलं होते का?

Fact Check: 2014 मध्ये ''देश पुन्हा स्वतंत्र'' झाला सामनाने खरंच असं वृत्त दिलं होते का?

कंगना रणौतने 'देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं' असं वक्तव्य केलं होतं. मात्र, 2014 ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचा ''हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!!'' अशा आशयाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काय आहे या फोटोची सत्यता? वाचा

Fact Check: 2014 मध्ये देश पुन्हा स्वतंत्र झाला सामनाने खरंच असं वृत्त दिलं होते का?
X

कंगना रणौतने 'देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं' असं वक्तव्य केलं होतं. मात्र, 2014 ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचा ''हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!!'' अशा आशयाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काय आहे या फोटोची सत्यता? वाचा

सध्या सोशल मीडियावर सामना वृत्तपत्राचा एक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठ बातमीच्या हेडलाईन मध्ये बाळासाहेबांना मानवंदना! शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली, 18 जागांवर दणदणीत विजय. हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! अशी ठळक बातमी दिसत आहे. मॅक्समहाराष्ट्रच्या वाचकांनी हे वृत्त खरं आहे का? यासाठी पडताळणीसाठी पाठवलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून देशात एक नवीन वाद निर्माण आहे. अभिनेत्री कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे.

त्यामुळं देशात नवीन वाद निर्माण झाला आहे. कंगना रणौत च्या या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील कंगना रणौत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. ते म्हणाले.. "खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी."

असं म्हणत कंगना रणौतच्या वक्तव्याला समर्थन दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेने कंगना रणौतसह विक्रम गोखले यांच्यावर टीका केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले ''हा विक्षिप्तपणा आहे. विक्रम गोखले यांच्यासारख्या सुज्ञ कलावंतानी असे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. देशाचं स्वतंत्र हे भीक असेल तर गेली ७५ वर्षे ते भीक साजरी करतात का?. तसेच यंदाही ७५ वर्षे कशासाठी साजरे करता. कंगनाच्या म्हटल्याप्रमाणे साडेसात वर्षे साजरे करा. ७५ च्या जागी ७.५ स्वतंत्र्याचे वर्ष साजरे करा. म्हणजे आम्हाला कळेल कंगना योग्य आहे."

अशा शब्दांत कंगना आणि विक्रम गोखले यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात दैनिक लोकसत्ता ने वृत्त दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचा देखील एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

संगिता पाटील या युजरने 17 मे 2014. दैनिक सामनाची हेडलाईन असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.


@UpdeshMotePatil या युजरने देखील

खरं स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले या वक्तव्यावरून कंगनाला शिव्या घालणाऱ्या समर्थकांनो बघा सामनाची २०१४ ची हेडलाईन

आता घाला पाहू शिव्या संपादकाला असं म्हणत हा स्क्रिन शॉट शेअर केला आहे.



@abhiramgpatil या युजरने देखील हा फोटो शेअर करत

सामनाची हेडलाईन बघा. शिवसेना 'काँग्रेसमुक्त भारतात' काँग्रेस पक्षासोबत सत्तेत बसली आहे. डोक्याला शॉट! असं कॅप्शन दिलं आहे.



तसंच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला

'घ्या! अजून एक स्वातंत्र्य लढा! अरे हा देश एकूण किती वेळा स्वतंत्र झाला?'

असा सवाल केला आहे.

विश्वंभर चौधरी यांच्या या पोस्टखाली अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.

त्यामध्ये श्रीकांत मुळे हे किमान तुम्ही तरी हे असे व्हाट्सएप पोस्ट्स प्रसारित करू नयेत असे वाटते मला सर असं म्हणत या पोस्टच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. काय म्हटलंय व्हायरल फोटोमध्ये?

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये... बाळासाहेबांना मानवंदना! शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली, 18 जागांवर दणदणीत विजय. हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! असं ठळक मथळ्यात दिसून येत आहे. व्हायरल होणाऱ्या वृत्तपत्रामधील बाकी मजकूर फारसा दिसून येत नाही.

काय आहे सत्य?

2014 च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल 16 मे 2014 ला लागला. 17 मे च्या वृत्तपत्रांनी या संदर्भात बातम्या दिल्या आहेत. त्यामुळं आम्ही सामना वृत्तपत्राची ऑनलाईन आवृत्तीमध्ये 17 मे 2014 चा पेपर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी हे वृत्तपत्र मिळाले नाही. सामना कार्यालयाशी देखील आम्ही संपर्क साधला. मात्र, सामनामधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर आम्ही महाराष्ट्र विधीमंडळाच्या ग्रंथालयामध्ये 17 मेचा सामना चा अंक शोधला. यामध्ये आम्हाला सामनाचा हा अंक मिळाला. या वृत्तपत्राची हेडलाईन हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! बाळासाहेबांना मानवंदना! शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली, 18 जागांवर दणदणीत विजय. अशा ठळक मथळ्याखाली हेडलाईन दिसत आहे.

देशभरात मोदी आणि मोदीच. कॉंग्रेसच वाटोळं झालं. 335 एनडीएला जबरदस्त बहुमत, 61 युपीएचा सुफडा साफ, महाराष्ट्रात महायुतीची मुसंडी मुंबई, ठाणे, कोकणातील सर्व जागा जिंकल्या. कॉंग्रेसला फक्त 2 तर राष्ट्रवादीच्या पारड्यात 4 जागा. मनसेला औकात दाखवली. उमेदवाराचे डिपॉझीट गुल. मुंबई, महाराष्ट्र देश सर्वत्र जल्लोष... असं म्हणत पहिल्या पेजवर लोकांचा जल्लोष दाखवला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो दिसत आहे. त्या फोटोचं कॅप्शन आईचा आशिर्वाद असं दिलं आहे.

तसंच हा 'हिंदूस्थानाचा विजय' 'सबका साथ सबका विकास' 21 मे शपथविधी. या ठळक अक्षरात बातम्या दिसत आहेत. वृत्तपत्राच्या उजव्या बाजूला कोकणात नरकासुराचा वध, नाशकात भूजबळ उताणे, ठाण्यात 'गणेश' विसर्जन अशा स्वरुपाचं वृत्त दिलं आहे.





निष्कर्ष:

हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! अशा आशयाचा व्हायरल होणारा फोटो सत्य असून शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात 17 मे 2014 ला 'हिंदुस्थान कॉंग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!!' अशी हेडलाईन देण्यात आल्याचं मॅक्समहाराष्ट्रच्या फॅक्ट चेक मध्ये स्पष्ट होतं.

Updated : 6 Sept 2022 12:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top