Fact Check | जनधन खात्यात आलेले ५०० रुपये वेळेवर काढले नाही तर परत जाणार नाहीत!
X
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व उद्योगधंदे आणि बाजारपेठा ठप्प असल्याने अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईपर्यंत केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे.
लॉकडाऊनदरम्यान महिलांना घर चालवण्यासाठी साहाय्य होईल यासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेची घोषणा केली. गरीब महिलांच्या जनधन बँक खात्यात ३ महिने ५०० रुपये प्रति महिना याप्रमाणे १,५०० मदत निधी दिला जाणार आहे. या निधीचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
मात्र, हे पैसे वेळेवर काढले नाहीत तर निधी परत जाईल आशा काही अफवा गेल्या काही दिवसांत पसरल्या आहेत. त्यामुळे पैसे वापस जाण्याच्या भीतीने लाभधारक महिलांनी पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर गर्दी केली आहे.
अनेक ठिकाणी महिलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाहीयत. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे आणि लॉकडाऊनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय.
हे आहे वास्तव
गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांना हे अर्थसाहाय्य केलं जात आहे. लॉकडाऊनच्या काळात घर चालवण्यास अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून ही मदत दिली जात आहे. त्यामुळे ती परत घेण्याचा प्रश्नच नाही.
अशाप्रकारच्या अफवा आणि गैरसमज पसरल्यानंतर केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाने (PIB) यावर अधिकृत खुलासा केला आहे. जनधन खात्यातून पैसे काढले गेले नाहीत तर सरकार ती रक्कम वापस घेणार नसल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे पैसे काढण्यास उशीर झाला किंवा काढले नाहीत तरी ते खात्यावरच राहणार आहेत. ते पुन्हा सरकारजमा होणार नाहीत.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1249742353788620801?s=19
त्यामुळे पैसे परत जाण्याच्या भीतीनं बँकांबाहेर गर्दी करण्याची गरज नाही. अशाप्रकारे आपण कोरोनाच्या प्रसाराला आमंत्रणच देत आहोत.