Fact Check | 'तो' व्हिडीओ ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडीओ नाही; वाचा काय आहे सत्य
X
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल रोजी निधन झालं. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ऋषी कपूर यांच्याविषयी सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यादरम्यान ऋषी कपूर यांचा एक व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऋषी कपूर रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि रुग्णालयाच्या स्टाफमधील एक तरुण ऋषी कपूर यांच्यासमोर गाणं गात आहे. हा व्हिडीओ ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडीओ आहे असं अनेक पोस्टमध्ये म्हटलंय.
ऋषी कपूर यांचं निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा हा व्हिडीओ काढला गेल्याचं सांगण्यात येतंय.
हे आहे सत्य :
ऋषी कपूर यांच्यासोबत व्हिडीओत दिसणाऱ्या युवकाचं नाव आहे धीरजकुमार सानू. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह व्हायरल झाल्यानंतर धीरजकुमार याने याबाबत खरी माहिती सांगितली.
ऋषी कपूर यांना फेब्रुवारी महिन्यात उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धीरजकुमार त्याच रुग्णालयात काम करतो. तेव्हा त्याने ४ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ शूट केला आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे.
https://youtu.be/p_2MrCr7JhY
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धीरजकुमार याने आपल्या आपल्या युट्युब चॅनेलवर याबाबत खुलासा केला आहे. हा व्हिडीओ दोन महिन्यांपूर्वीचा असून तो ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडीओ म्हणून चुकीच्या माहितीसह व्हायरल होत असल्याचं त्यानं म्हटलंय.
https://youtu.be/BpvqaGGpX_k
निष्कर्ष :
ऋषी कपूर यांच्या निधनाच्या आधी त्यांचा शेवटचा व्हिडीओ म्हणून व्हायरल होत असलेली माहिती चुकीची आहे. हा व्हिडीओ दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता.