Home > Fact Check > Fact Check : सिध्दू मुसेवालाच्या हत्येचा कथीत आरोपी गोल्डी बराड याचा भगवंत मान यांच्यासोबतचा फोटो खरा आहे का?

Fact Check : सिध्दू मुसेवालाच्या हत्येचा कथीत आरोपी गोल्डी बराड याचा भगवंत मान यांच्यासोबतचा फोटो खरा आहे का?

Fact Check : सिध्दू मुसेवालाच्या हत्येचा कथीत आरोपी गोल्डी बराड याचा भगवंत मान यांच्यासोबतचा फोटो खरा आहे का?
X

प्रसिध्द पंजाबी गायक सिध्दू मुसेवालाची हत्या झाल्याने खळबळ उडाली. तर या हत्येची जबाबदारी गँगस्टार गोल्डी बराड नावाच्या व्यक्तीने घेतली. त्यापार्श्वभुमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा गोल्डी बराड नावाच्या व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा...

प्रसिध्द पंजाबी गायक सिध्दू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली. या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. दरम्यान या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग आणि गँगस्टर गोल्डी बराड यांनी घेतली असल्याचे वृत्त द क्विंट हिंदीने दिले आहे. मात्र या घटनेनंतर एक स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट गोल्डी बराड नावाच्या फेसबुक अकाऊंटचा आहे. त्यामध्ये एक व्यक्ती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत दिसत आहे. एवढंच नाही तर तो व्यक्ती भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देत आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट शेअर करतांना हा व्यक्ती सिध्दू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा गोल्डी बराड आहे, असा दावा केला जात आहे.

RSS चे मुखपत्र ऑर्गनायजरचे पत्रकार निशांत अजाद यांनी कथीत गोल्डी बराडसोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा फोटो ट्वीट केला आहे. तर त्यावर म्हटले आहे की, कॅनाडातील गोल्डी बराड याने सिध्दू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. मात्र निशांत अजाद यांनी ते ट्वीट डिलीट केले.






झी न्यूजचे पत्रकार अभिजित शाक्य यांनीही हा फोटो ट्वीट करत अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांना टॅग केले आहे. त्यामध्ये त्यांनीही कॅनडातील गोल्डी बराड याने सिध्दू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली असल्याचे म्हटले आहे.





काँग्रेस नेत्या राधिका खेडा यांनीही पोस्ट ट्वीट करत हाच दावा केला होता. मात्र त्यानंतर त्यांनीही हे ट्वीट डिलीट केले. तसेच राधिका खेडा यांनी केलेल्या ट्वीटबद्दल माफी मागितली.




भाजप समर्थक ट्वीटर वापरक्ते @Mrsinha_ यांनीही ट्वीट करत म्हटले आहे की, हाच तो गोल्डी बराड आहे. ज्याने सिध्दू मुसेवालाची हत्या केली आहे. तर सिध्दू मुसेवालाची सुरक्षा काढून घेणे हा मोठ्या कटाचा भाग होता का? गोल्डीचे काम सोपं करण्यासाठी आम आदमी पक्षाने सिध्दू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली का?, असे प्रश्न @MrSinha_ यांनी उपस्थित केले आहेत.








अलोक भट्ट नावाच्या ट्वीटर वापरकर्त्यांनीही अशाच प्रकारे दावा केला आहे. मात्र नंतर त्याने हे ट्वीट डिलीट करून हा दुसराच गोल्डी बराड असल्याचे स्पष्टीकरण दिले.

पडताळणी-

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अल्ट न्यूजने या फोटोत दिसणाऱ्या गोल्डी बराड नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटला भेट दिली. तर या गोल्डी बराडच्या फेसबुक अकाऊंटवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबतचा फोटो 10 मार्च रोजी अपलोड केला असल्याचे आढळून आले. त्यामध्ये भगवंत मान यांची पंजाबच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर हा फोटो अजूनही फेसबुकवर उपलब्ध आहे.





गोल्डी बराडचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, माझे नाव गोल्डी बराड असून माझ्या वडिलांचे नाव रजिंदर सिंह आहे. मी जांडवाला गावाचा निवासी आहे. तर सिध्दू मुसेवालाच्या हत्येनंतर माझ्या फोटोचा दुरुपयोग केला जात असल्याचे भगवंत मान यांच्यासोबत फोटो असलेल्या गोल्डी बराडने म्हटले आहे.





या फेसबुक पोस्टनंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असलेल्या गोल्डी बराडशी अल्ट न्यूजने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या फोटोचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी आपल्या आधार कार्डचा अल्ट न्यूजला पाठवला.

गुगलवर काही की-वर्ड सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला दिल्ली पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर एक प्रेस रिलीज मिळाली. त्यामध्ये गँगस्टर गोल्डी बराड याच्याविषयी संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. तर या प्रेस रिलीजमधील माहितीनुसार गोल्डी बराडचे नाव सत्येंद्रजीत सिंह आहे तर त्याच्या वडिलांचे नाव शमशेर सिंह आहे.

निष्कर्ष

वरील माहितीवरून असे दिसून येत आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोल्डी बराडचा फोटो आणि सिध्दू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा कथीत गोल्डी बराड गँगस्टर दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत. मात्र काही नामांकित पत्रकार आणि राजकीय नेत्यांनी एकसारखे नाव असल्यामुळे गँगस्टर गोल्डी बराडचा भगवंत मान यांच्यासोबत फोटो असल्याचा चुकीचा दावा केला आहे.




यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते की, ज्या गोल्डी बराडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो गोल्डी बराड सातत्याने फेसबुकवर सक्रीय असल्याचे दिसत आहे. मात्र गँगस्टर गोल्डी बराड हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Alt News : https://www.altnews.in/hindi/fact-check-sidhu-moose-wala-murder-case-the-person-in-the-viral-image-is-not-that-goldy-brar/

Updated : 5 Jun 2022 1:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top