Fact Check: अण्णा हजारे यांनी खरंच देशवासियांची माफी मागितली का?
X
सध्या सोशल मीडियावर अण्णा हजारे यांच्या कथित @Anna_Hazare_IND अकाउंटवरून एक ट्वीट व्हायरल होत आहे.
या ट्वीटमध्येRSS एक जातिवादी संघटन आहे. देशातील तरुण वर्गाची माथी भडकवन्याचं ज्ञान नागपुरच्या शाखेत दिलं जाते. कॉंग्रेस विरुद्ध आंदोलन करायला मला RSS चा पाठींबा होता. मला वाटलं भाजपा सत्तेत आल्यावर देश सुधारेल, पण देशाचं दुर्देव्य की मोदी सारखा आडाणी माणुस त्यांच्या नशिबी आला, आणि आज सरकारी संपत्ती विकुन देश चालवायची वेळ आले. मी समस्त भारत वासियांचा गुन्हेगार आहे. मला माफ करा. या आशयाचं ट्वीट व्हायरल होतं आहे.
फेसबूकवर देखील अशाच प्रकारे अण्णा हजारे यांचा हा मेसेज व्हायरल केला जात आहे. Rajaram Tukaram Nalawade यांनी या संदर्भात 4 सप्टेंबर 2021 ला पोस्ट केली आहे. आत्तापर्यंत या पोस्टला 26 लोकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच 24 लोकांनी हे पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे सत्य?
@Anna_Hazare_IND या ट्वीटर अकांउटवर अशा आशयाची कोणतीही पोस्ट आम्हाला आढळली नाही. मात्र, 3 सप्टेंबरला 9:51 ला एक पोस्ट या अकांउटवर पोस्ट करण्यात आली आहे. सदर पोस्ट हिंदी मध्ये असून त्यामध्ये
जब मैं सीएम उद्धव ठाकरे के दफ्तर में धरने के लिए परमिशन लेने गया तो मुझे बाहर प्रतीक्षा करने को कहा गया..
इस बीच "संजय राउत" 4 पुलिस वालों के साथ हाथ में डंडे लेकर 3 बार मेरे सामने से गुजरे तो हम वापस लौट गए।
इस तरह हमको डंडों से डराना लोकतंत्र की हत्या है।
असं हिंदी ट्वीट करण्यात आलं आहे.
या पोस्टचा आणि व्हायरल झालेल्या पोस्टची वेळ एकच आहे. तसंच व्हायरल होणाऱ्या पोस्टची शब्द संख्या ही 280 पेक्षा अधिक आहे.
ट्वीटर वर कोणत्याही ट्वीटची शब्द संख्या 280 पेक्षा अधिक नसते. मात्र, या व्हायरल ट्वीटची शब्द संख्या 366 आहे. यावरून 3 सप्टेंबरच्या @Anna_Hazare_IND या ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्वीट चा मजकूर हटवून या ठिकाणी
'RSS एक जातिवादी संघटन आहे. देशातील तरुण वर्गाची माथी भडकवन्याचं ज्ञान नागपुरच्या शाखेत दिलं जाते. कॉंग्रेस विरुद्ध आंदोलन करायला मला RSS चा पाठींबा होता. मला वाटलं भाजपा सत्तेत आल्यावर देश सुधारेल, पण देशाचं दुर्देव्य की मोदी सारखा आडाणी माणुस त्यांच्या नशिबी आला, आणि आज सरकारी संपत्ती विकुन देश चालवायची वेळ आले. मी समस्त भारत वासियांचा गुन्हेगार आहे. मला माफ करा'.
हा मजकूर पेस्ट करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे दोनही ट्वीट ची फॉन्ट साइज आणि फॉन्ट स्टाईल पाहता, ही बाब स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळं सदर पोस्ट ही फोटो शॉप करून व्हायरल करण्यात आल्याचं दिसून येतं.
@Anna_Hazare_IND अण्णा हजारे यांचं आहे का?
@Anna_Hazare_IND या ट्वीटर अकाउंट संदर्भात आम्ही अण्णा हजारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क केला असता, जनसंपर्क अधिकारी संजय पठाडे यांनी अण्णा हजारे यांचं कोणतंही अधिकृत ट्वीटर अकाउंट नसल्याची माहिती मॅक्समहाराष्ट्रला दिली.
ते म्हणाले अण्णा हजारे यांच्या नावाने अनेक अकाउंट सोशल मीडियावर आहेत. आम्ही अण्णा हजारे यांचं एक अकाउंट ट्वीटरकडे Verified करण्यासाठी पाठवलं होतं. मात्र, ट्वीटर ने सोशल मीडियावर अनेक अकाउंट असल्यानं अद्यापपर्यंत ते Verified केलेले नाही. आमचा प्रयत्न सुरू आहे. तसंच अण्णांच्या नावाने व्हायरल झालेली ही पोस्ट खोटी असून या संदर्भात आम्ही ट्वीटरकडे तक्रार नोंदवणार आहोत. अण्णा हजारे यांचं अधिकृत फेसबूक पेज आहे. त्यावर अण्णा आपली अधिकृत भूमिका मांडत असतात. ट्वीटरवर अण्णांचं कोणतंही अधिकृत अकाउंट नाही.
अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांचे जनसंपर्क अधिकारी संजय पठाडे यांनी दिली आहे.
निष्कर्श
एकंदरीत अण्णा हजारे यांच्या नावाने @Anna_Hazare_IND असलेलं हे ट्वीटर अकाउंट हजारे यांचं अधिकृत अकाउंट नाही. तसंच अण्णा हजारे यांच्या नावाने व्हायरल होणारा मेसेज हा फोटोशॉप केल्याचं स्पष्ट होतं.