झाला तर झाला कोविड काय फरक पडणार आहे?
कोरोना होऊन गेल्यानंतर विषाणू कोणत्या खुणा शरीरावर कायमस्वरुपी ठेऊन जातो? कोरोनापासून सुटका झाल्यानंतर शरीरातील कोणते अवयव धोक्यात येऊ शकतात? कोरोना व्हायरस काही नाही... कोरोना झाला तर काय फरक पडणार आहे असं म्हणणाऱ्या लोकांनी साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांनी सांगितलेली माहिती आणि त्यांचा अनुभव नक्की वाचा...
X
किती तरी लोकांच्या मनामध्ये असा विचार कधीतरी डोकावून जातो. कारण What's app ने आपल्याला सांगितले आहे कि, मृत्यू दर कमी आहे. कोविड फ्लू पेक्षा साधा आहे वगैरे वगैरे. आणि तज्ञांपेक्षा आपण फॉरवर्ड मेसेजेस वर अधिक भरोसा ठेवतो.
तुम्ही माझ्या या पूर्वीच्या पोस्ट वाचल्या असतील तर "करोना आपल्या शरीरातील बरेचसे अवयव बाधित करू शकतो" हे तुम्हाला माहित आहे. ज्या ज्या अवयावांमधील पेशीवर ACE2 रीसेप्टर आहेत, असे सर्व अवयव बाधित होऊ शकतात.
आत्तापर्यंत शरीरामध्ये ७२ ठिकाणी ACE2 रीसेप्टर असणाऱ्या पेशी सापडल्या आहेत. त्यातील काही महत्वाच्या जागा पुढीलप्रमाणे – श्वसनसंस्था, डोळे, हृदयाच्या पेशी आणि धमन्यांमधील अंतस्थ आवरणाच्या पेशी, पचनसंस्थेमधील विविध भागांचे अंतस्थ आवरण, किडनी व त्याभवतालच्या नलिका, अंडकोश (होय टेस्टीज देखील), लिव्हर, पित्ताशय, चेतासंस्था, थायरोईड, स्वादुपिंड इ. (सोबतचे चित्र पहा.) यातील कोणत्याही अवयवाला करोना बाधित करू शकतो. यामुळे लक्षणे निर्माण होतीलच असे नाही. त्या अवयवाला कायमस्वरूपी नुकसान होईलच असे नाही. पण शक्यता अनेक असू शकतात, विशेषतः हा विषाणूजन्य आजार आहे म्हणून आणि नूतन अकल्पित (novel) आजार आहे म्हणून या बाबतीमध्ये हळूहळू शास्त्रीय माहिती उपलब्ध होईल.
करोना विविध अवयवांना बाधित करतो म्हणून करोना, सर्दी किंवा फ्लू पेक्षा वेगळा व गंभीर आजार आहे. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज फेसबुक मेमरीने गेल्या ११ ऑगस्ट २०२० ला काढलेला एक फोटो आज दाखवला.
तो pulse-oxymeter चा फोटो मी ११ तास मास्क लावल्यानंतर माझे ऑक्सिजनचे प्रमाण बघताना काढला होता. . मग मी लगेच तसाच अजून एक फोटो आज सकाळी काढला.
दोन्ही फोटो सोबत दिले आहेत .
काही फरक दिसतोय का त्यातील आकड्यांमध्ये?
बरोबर!
sPO2 मध्ये काही खास फरक नाही. मात्र माझ्या हृदयाच्या गतीमधील फरक लक्षात घ्या!
मला २०२० च्या शेवटी कधीतरी करोना संसर्ग झाला होता. एकही लक्षण आले नाही. त्यामुळे तपासणी झालीच नाही. लस घेण्यापूर्वी मी लकीली antibody टेस्ट केल्या म्हणून करोना संसर्ग होऊन गेला हे समजले तरी. माझे कुटुंबीय देखील करोनाबाधित झाले नाहीत. (मास्क ने मला वाचवले, अर्थात ही पोस्ट त्याबद्दल नाही.)
मला कोविड झाला नाही, लक्षणे नव्हती, तरी देखील करोना जाताना स्वतःची खुण मागे सोडून गेलाय. दोन्ही पल्स ऑक्सिमीटर मधील हृदयाचे ठोके किती आहेत बघा. आता माझ्या हृदयाचे ठोके नेहमी १०० च्या वर असतात .
आता त्या संपर्कानंतर ८ ते ९ महिने उलटून गेले आहेत. तरीही अजून करोना संसर्गाचा परिणाम कमी झालेला नाही. हृदय सतत अधिक गतीने काम करत असल्याने त्यावर ताण वाढत रहाणार आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये / माझ्या म्हातारपणी मला दिसणार आहेत.
हृदयाविषयी तक्रारींवर लक्ष ठेवणे व त्यावर लगेच उपाय करणे, हे आता मला आयुष्यभर करावे लागणार आहे! तुम्हाला अजून करोना संसर्ग झाला नसेल तर मनापासून आणि १००% काळजी घ्या. करोना संसर्ग होऊन गेला असेल तर भविष्यामध्ये शरीराची चांगली काळजी घ्या.
इतरांना योग्य माहिती देऊन इतरांना करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सक्षम बनवा! आपण एक केस जरी टाळू शकलो तरीही भविष्यातील लाखो केसेस टाळण्यासारखे आहे.
करोना साधी सर्दी नाही हे जास्तीत जास्त लोकांना पटायला हवे. धोका नीट समजला कि आपण स्वतःहून काळजी घेऊ आणि स्वतःला आणि कुटुंबियांना देखील सुरक्षित ठेऊ .
अधिक माहिती - https://tinyurl.com/yhszdrcf
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ, मिरज.
साभार@UHCGMCMIRAJ