Home > News Update > World tribal Day: मुख्यंमंत्रीसाहेब आदिवासी कुटुंबियांची कधी भेट घेणार?

World tribal Day: मुख्यंमंत्रीसाहेब आदिवासी कुटुंबियांची कधी भेट घेणार?

आदिवासी दिनाच्या दिवशी तरी कोरोनाग्रस्त उध्वस्त कुटुंबांची वेदना महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचेल का ? आदिवासी कुटंबियांची कैफियत आणि आदिवासी वृद्धांची हेलावून टाकणारी कहाणी… आदिवासी दिनानिमित्त हेरंब कुलकर्णी यांचा ठाकरे सरकारला सवाल...

World tribal Day: मुख्यंमंत्रीसाहेब आदिवासी कुटुंबियांची कधी भेट घेणार?
X

आज आदिवासी दिन.आदिवासी बांधवांना दिनाच्या शुभेच्छा.पण या वृद्ध आदिवासी पती-पत्नींना मात्र शुभेच्छा द्यायचं धाडस होत नाही याचं कारण काल देवाची वाडी,समशेरपूर ता अकोले,जि अहमदनगर त्यांच्या घरी भेट दिली तेव्हा मन उदास झालं... दोन महिन्यापूर्वी अवघा २२ वर्षांचा त्यांचा मुलगा कोरोनाने मृत्यू पावला. त्याची पत्नी माहेरी निघून गेली चार मुलींची लग्न झालेली. त्या सासरी आणि मजुरी करणाऱ्या गरीब आहेत आणि आता हे दोघे वृद्ध (वय अनुक्रमे ७० व ६५) पती-पत्नी एकत्र मागे उरले आहेत.. आजींना डोळ्यांना नीट दिसत नाही गुडघे दुखतात बाबांची पाठ दुखते त्यामुळे काहीच काम करता येत नाही. फक्त वाळलेल्या काटक्या गोळा करून फक्त चुलीत पेटवतात व मुलाने मृत्यूपूर्वी थोडेसे धान्य जमवले होते त्यावर गुजराण सुरू आहे...वस्ती गावापासून खूप दूर आहे ... जवळ राहणारा भाऊ तोही मजुरीने जातो.. थोडेफार काही आणून देतो... पाण्याचा हंडाही ह्यांना उचलता येत नाही..तोही इतरांकडून भरून घ्यावा लागतो

पासपोर्ट वाल्यांनी कोरोना आणला आणि रेशन कार्डला त्याची सजा भोगावी लागली.. हे वास्तव किती भीषण आहे हे असे कुटुंब बघितल्यावर कळते..कोरोनात फक्त मध्यमवर्गीय गेले गरिबांवर फार परिणाम झाला नाही.. असे बोलणार्यांनी एकदा अशा कुटुंबांना भेटी द्याव्यात म्हणजे वास्तव कळेल.. कोरोना ने उध्वस्त केलेले हे कुटुंब ७०वर्षांचे आजोबा आणि ६५ वर्षांची आजी पुढे कसे जगतील...? त्यांना आम्ही वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवला तेव्हा त्यांच्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला मी गरीब आहे पण माझं मन या दोघांना वृद्धाश्रमात पाठवायला तयार होत नाही ही आदिवासी बांधवांची एकमेकांविषयाची असलेली आस्था बघून आमच्याही डोळ्यात पाणी आलं...

आदिवासी दिनाच्या दिवशी तरी कोरोनाग्रस्त उध्वस्त कुटुंबांची वेदना महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचेल का ? की सरकार केवळ कोरड्या शुभेच्छा या आदिवासी बांधवांना देणार आहे....

कोरोनात मृत्यू पावलेल्या २०,००० कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबाची अशी विषण्ण करणारी कहाणी आहे प्रत्यक्ष कुटुंबाला जेव्हा आपण भेटत होतो.. तेव्हा हे वास्तव समजते आणि सरकार मात्र अजूनही या कुटुंबांना मदत जाहीर करायला तयार नाही.आदिवासी दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री - मंत्री यांनी अशा आदिवासी भागातील तरुणाने उध्वस्त केलेल्या कुटुंबांना भेटी द्याव्यात म्हणजे वास्तव कळेल...

तिथून निघालो.. सोबत सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, मनोज गायकवाड नवनाथ नेहे होते . स्थानिक पातळीवर संदीप दराडे त्या कुटुंबाकडे लक्ष देतीलच पण सरकार काय करणार आहे ? हा खरा मुद्दा आहे

Updated : 9 Aug 2021 8:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top