मुंबईत होम क्वारंटाईनच्या नव्या गाईडलाइन्स
राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आढळून येत आहेत. तर ओमायक्रॉन व्हेरियंटनेही प्रशासनाचे टेन्शन वाढवले आहे. गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येने 20 हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तर मुंबई महापालिकेने क्वारंटाईनबाबत नवे नियम जारी केले आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसांवरून सात दिवसांचा करण्यात आला आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Jan 2022 4:13 PM IST
X
X
मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सहव्याधी असल्या तरी तरी ज्यांना कोरोनाची लक्षणे नसतील किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असतील असे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेऊ शकतात. त्याचप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सातव्या दिवशी सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपणार आहे. तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेली व्यक्ती कोरोना संदर्भातील नियम पाळून रुग्णाची 24 तास काळजी घेऊ शकणार आहेत. या नव्या मार्गदर्शक सुचनांमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
नव्या मार्गदर्शक सुचना-
- कोरोनाचे निदान झाल्यानंतर रुग्णाला किमान 7 दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. यामध्ये कोरोना रुग्णाला शेवटचे तीन दिवस ताप नसेल तर त्याचा क्वारंटाईन कालावधी संपणार आहे.
- कोरोना रुग्णाला शेवटच्या तीन दिवसात ताप आल्यास रुग्णाचा क्वारंटाईन कालावधीत वाढ होणार आहे.
- क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतरही कोरोना रुग्णाला मास्क लावणे आणि कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- मात्र अतिजोखिम गटातील व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधी 7 दिवसानंतरच पुर्ण होणार आहे. मात्र या कालावधीत कोणत्याच प्रकारची लक्षणे आढळून न आल्यास पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे.
- कोरोना रुग्णाला सलग तीन दिवस 100 अंशापेक्षा जास्त ताप असल्यास संबंधीत रुग्णांने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा खाली आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा.
- रुग्णाच्या छातीत सतत दुखत असल्यास किंवा रुग्णाचा मानसिक ताण आणि रुग्णाला थकवा जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, अशा मार्गदर्शक सुचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत.
रुग्णांसाठीही मार्गदर्शक सूचना
- एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याने स्वतःला होम क्वारंटाईन व्हावे. तर रुग्ण ज्या खोलीत राहणार आहे. ती खोली इतर कोणीही वापरू नये.
- जो रुग्ण मधुमेह, हृदयरोग, ब्लड प्रेशर, किंवा सहव्याधीग्रस्त असेल त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
- कोरोना रुग्ण ज्या खोलीत होम क्वारंटाईन होणार आहे. त्या रुमची हवा खेळती हवी. बंदिस्त खोलीत रुग्णाला क्वारंटाईन करू नये.
- कोरोना रुग्णाने तीन पडद्यांचा मास्क वापरावा. तसेच रुग्ण वापरत असलेला मास्क सर्दी किंवा खोकल्यामुळे ओला झाला तर तातडीने बदलावा. तसेच इतरवेळी मास्क आठ तासांनी बदलावा. याबरोबरच शक्यतो N95 मास्क वापरावा.
- रुग्णाने स्वतःची काळजी घ्यावी. तसेच आंबट किंवा थंड पदार्थ खाऊ नयेत.
- रुग्णाने वारंवार हात धुवावेत, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.
- होम क्वारंटाईनच्या काळात वापरलेल्या कुठल्याही वस्तू इतर कुणी वापरू नये याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगितले आहे.
- रुग्णाचा हात ज्या ठिकाणी लागलेला असेल असे दरवाजे, खिडक्या, हँडल, बटणं वारंवार स्वच्छ करण्यात यावेत.
- मास्क ओला झाला तर तातडीने बदलावा आणि मास्क वापरून झाल्यावर त्याचे तुकडे करून त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी.
रुग्णाची काळजी घेणाऱ्याने काय काळजी घ्यावी-
- रुग्णाची काळजी घेणाऱ्याने तीन पडद्याचे मास्क लावावे. तसेच शक्यतो N95 मास्कचा वापर करावा.
- 72 तासांनी मास्कचे लहान लहान तुकडे करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
- मास्कच्या पुढच्या बाजुला स्पर्श करू नये.
- रुग्णाची काळजी घेणाऱ्याने हात सतत सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.
- रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने शक्य असेल तर हातात डिस्पोजल ग्लोज घालावेत.
Updated : 7 Jan 2022 4:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire