राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 72 टक्के रुग्ण 5 जिल्ह्यांमध्ये
X
राज्यात कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असले तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्य़ा उपचाराधीन रुग्णांची संख्या 50,095 एवढी आहे. पण यापैकी 72 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आहेत. पुण्यात 12 हजार 325, ठाण्यात 7 हजार 273, मुंबईमध्ये 4 हजार 3, सातारा 6 हजार 603, अहमदनगर 5 हजार 701 अशी रुग्णसंख्या आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. गणेशोत्सवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनी रुग्णांची संख्या वाढली असल्याने नागरिकांनी उत्सवाच्या काळात गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
रविवारी झालेल्या डॉक्टर परिषदेत मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात भीती व्यक्त करत नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. "आता सणवाराचे दिवस सुरू. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढताना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा, यात राजकारण आणू नका. राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाचा खेळ होऊ देऊ नका."
असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले. "लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. 'माझा डॉक्टरांनी' ही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी." असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.