लस न घेताच लसीकरणाचे सर्टिफिकेट, नवा घोटाळा?
X
मुंबईतील कांदिवलीमध्ये कोरोनावरील लस घोटाळा उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. पण आता या लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेटचा गोंधळ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा गोंधळ कांदिवलीमध्येच समोर आला आहे. आपण लसीकरणासाठी नोंदणी केली होती, पण लस घेतली नाही तरीही आपल्याला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र आले आहे, अशी तक्रार निलेश मैत्री नावाच्या व्यक्तीने केली आहे. या तक्रारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
निलेश मैत्री नावाच्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता कोरोनाच्या लसीच्या पहिल्या डोससाठी कोविन ॲपवर नोंदणी केली. त्यानंतर निलेश यांना कांदिवलीतील चव्हाण हॉस्पिटलमध्ये लस मिळण्यासाठीचा स्लॉटसुद्धा बुक झाला. पण ज्या दिवसाचा स्लॉट बुक झाला होता त्या दिवशी खाजगी कामानिमित्त निलेश हे लस घेण्यासाठी हॉस्पिटलला जाऊ शकले नाहीत. त्यानंतर लस घेण्यासाठी निलेश यांनी नवीन स्लॉट मिळण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा एकदा कोवीड एपवरुन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निलेश यांचना धक्काच बसला, कारण त्या एपवर त्यांना पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेटच उपलब्ध झाले. यामुळे निलेश हादरुन गेले.
यानंतर निलेश यांनी मनसेचे विभागप्रमुख दिनेश साळवी यांना संपर्क केला. त्यानंतर साळवी यांच्यासोबत निलेश मैत्री यांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही प्रमाणपत्र बोगस आहे असे मनसेचे दिनेश साळवी आणि निलेश मैत्री यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या तपासात सत्य समोर येईलच...पण लस घोटाळा ताजा असताना आता हा बनावट प्रमाणपत्राचा आरोप झाल्याने लसीकरण मोहीमेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या आधी लसीकरणाच्या घोटाळ्यात बनावट लस आणि बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह काह जणांना अटकही झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे लस न घेताच प्रमाणपत्र तेही सरकारी एपवर उपलबध होत असेल तर ती बाब गंभीर आहे, याची तातडीने दखल घेऊन दोषींना शिक्षा झाली तर असे प्रकार होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.