Home > मॅक्स रिपोर्ट > Mob lynching : चोरीच्या आरोपातून युवकाची हत्या, न्यायासाठी कुटूंबाचा आक्रोश

Mob lynching : चोरीच्या आरोपातून युवकाची हत्या, न्यायासाठी कुटूंबाचा आक्रोश

Mob lynching : चोरीच्या आरोपातून युवकाची हत्या, न्यायासाठी कुटूंबाचा आक्रोश
X

देशात मॉब लिंचिंगच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाईंदर शहरात चोरीचा आरोप करत 13 लोकांनी मिळून कृष्णा तुसामड याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर न्यायासाठी तुसामड कुटूंबाने टाहो फोडला आहे. मात्र या घटनेकडे माध्यमांसह राजकीय पक्षांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

सध्या भोंगा आणि हनुमान चालीसावरुन वाद सुरू आहे. मात्र या वादाच्या गोंगाटात देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाईंदरमध्ये सफाई काम करणाऱ्या कृष्णा तुसामड या युवकाची चोरीच्या आरोपाखाली जमावाने निघृण हत्या केली आहे. या प्रकरणात तीन जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकुण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू असल्याचे पोलिस सांगतात मात्र मयत कृष्णा तुसामड या युवकाच्या कुटूंबियांनी न्यायाची मागणी केली आहे.

कृष्णा तुसामड हा नागमणी इमिटेशन ज्वेलरी या दुकानात सफाईचे काम करत होता. 7 मे रोजी नेहमीप्रमाणे कृष्णा सकाळी 7 वा. कामावर गेला. त्यानतंर कृष्णाची आई वीरमती आणि वडील पालाराम हेसुध्दा कामावर गेले. मात्र दुपारी 12 च्या सुमारास कृष्णाची आई आणि वडील काम आटोपून घराकडे निघाले असताना त्यांना कृष्णाच्या कंपनीची गाडी दवाखान्याच्या समोर दिसली. ती गाडी कृष्णाच्या आईने ओळखल्याने कृष्णाची आई कोणाला काय झालं म्हणून गाडीकडे धावत गेली. तर गाडीतून कृष्णाला बाहेर काढले जात होते. त्यावेळी कृष्णाच्या आईने काय झालं आहे माझ्या कृष्णाला असं कंपनीच्या मालकाच्या मुलाला विचारले. त्यावेळी त्यांनी कृष्णा काम करताना पडल्याचे खोटे कारण सांगितले. मात्र दवाखान्यात डॉक्टर नसल्याने फॅमिली केअर दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र दवाखान्यात पोहचले असता कृष्णाचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगितले आणि त्यावेळी तिथेच असलेल्या कृष्णाच्या आई आणि बहिणीने टाहो फोडला, असे कृष्णाचे वडील पालाराम सांगतात.

कृष्णाचे निधन झाल्याचे सांगितल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलवले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिस दवाखान्यात दाखल झाले. त्यावेळी कंपनीच्या मालकाचा मुलगा तिथे होता. त्याने सांगितले की, कृष्णाने नकली अलंकाराची चोरी केल्याची शंका होती. त्यामुळे त्याने कबुल करावं म्हणून मारहाण केल्याची कबुली दिली. पण चोरीच्या या घेतलेल्या शंकेत माझ्या भावाचा जीव गेला, अशी प्रतिक्रीया कृष्णा तुसामडचा भाऊ सतिश तुसामड याने दिली.

कृष्णा तुसामड याच्यासह संपुर्ण परिवार साफ सफाईचे काम करत होता. त्यातच कृष्णाला एकूण चार अपत्ये. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश. सगळ्यात मोठी मुलगी नऊ वर्षांची तर सर्वात लहान मुलगी ही अवघ्या सहा महिन्यांची आहे. त्यामुळे चोरीच्या शंकेमुळे संपुर्ण परिवार उघड्यावर आल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. तसेच कृष्णाची लहान लेकरं पापा किधर हे असं विचारतात. तेव्हा आम्ही त्यांना गावाला गेला आहे, असं सांगतो. पण किती दिवस या चिमुकल्यांना असं अंधारात ठेवायचं असा सवाल कृष्णाचा भाऊ सतिश तुसामड विचारत होता.

सतिश म्हणाला, समजा त्याने चोरी केली असं आपण मानलं तर मग त्याला पोलिसांच्या हवाली का केलं नाही? कायदा हातात घेऊन आमच्या परिवाराला असं उघड्यावर आणण्याची काय गरज होती? असा प्रश्न विचारताना सतिशचा स्वर कातर झाला होता.

8 दिवस उलटून गेल्यानंतरही मुख्य प्रवाहातील माध्यमांचे या प्रकरणाकडे लक्ष नाही. तर मतांसाठी निवडणूकीच्या वेळी आमचे पाय धरणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळेच तर गरीबांना कोणीही वाली नसतो, अशी खंत तुसामड कुटूंबियांनी व्यक्त केली.

नकली दागिन्याची चोरी केल्याचा आरोप करत कृष्णाचा जीव घेण्यात आला आहे. मात्र या छोट्याशा शंकेमुळे चार लेकरांना बाप गमवावा लागला, त्याच्या पत्नीचा जीवनसाथी, आई-वडिलांचा आधार तर कुटूंबाचा सदस्य गमवावा लागल्याने तुसामड कुटूंबावर शोककळा पसरली आहे. तर आता आम्हाला न्याय हवा असल्याची मागणी पालाराम तुसामड यांनी केली आहे.

दुसरीकडे घरातील कमवता व्यक्तीच गेल्याने आम्ही चार लेकरांसह कुटूंब कसं चालवायचं असा प्रश्न कृष्णाची आई वीरमती तुसामड यांनी विचारला. तर मुलाच्या आठवणीने कृष्णाच्या आईने टाहो फोडला.

यावेळी पालाराम तुसामड यांनी या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत दाखवली. त्यामध्ये तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिसून आले. तर पोलिसांनी ११ जणांना अटक केल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी खरंच ११ जणांना अटक केली आहे का? याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असं पालाराम सांगतात. तर पोलिसांकडून आम्हाला यासंदर्भात माहिती देण्यात येत नसल्याची भावना पालाराम यांनी व्यक्त केली.

त्यानंतर या प्रकरणासंदर्भात नवघर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी मासाळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणात फिर्यादींकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नव्हता. फक्त त्यांचा मुलगा कामाला गेला होता आणि दुपारी कंपनीच्या गाडीत कृष्णाचा मृतदेह आणल्याचे त्यांनी पाहिले. एवढाच काय तो त्यांच्याकडे असलेला पुरावा. मात्र पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन तपास केला. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तर भारतीय दंड विधान १८६० कलम ३०२ आणि भारतीय दंड विधान १८६० कलम ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे तपासी पोलिस अधिकारी मासाळ यांनी सांगितले.

तसेच पोलिस निरीक्षक मासाळ म्हणाले की, या प्रकरणाचा कोणत्याही प्रकारे गवगवा झाला नाही. मात्र तरीही आम्ही प्रामाणिकपणे तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ११ आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक मासाळ यांनी दिली. मात्र आठ दिवसानंतरही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे त्या आरोपींना अटक कधी करणार, त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार असा आर्त सवाल तुसामड कुटूंबाने केला आहे.


Updated : 16 May 2022 9:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top