भारतीय आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर – डॉ. संग्राम पाटील
X
कोरोना काळात देशाला आरोग्याचं महत्त्व पटलं आणि गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून सरकारसह जनताही जागृत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतेय. कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला असून देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रासंबंधित विविध पैलूंवर तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्था आणि भारतीय आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे ? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करसपॉन्डट किरण सोनावणे यांनी इंग्लंड येथील डॉ. संग्राम पाटील यांच्याशी बातचीत केली.
डॉ. संग्राम पाटील हे भारतीय असून सध्या इंग्लंड येथे स्थायिक आहेत. गेल्या १६ महिन्यांपासून भारतातचं नव्हे तर जगभरात आपला अभ्यास व्हिडिओद्वारे पोहचून या महामारीत जनजागृती करण्याचे काम ते करत आहे. नागरिकांना कोरोना विषाणू संदर्भातली योग्य ती माहिती, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? तसेच कोरोनाच्या बदलते स्वरूप आणि महामारीतील बारकाव्यासह कोणती लस उपयुक्त आहे त्याचे काय परिणाम आहे अशा विविध प्रश्नांवर उत्तरं देताना नागरिकांशी ते जोडले गेले आहेत. आज महाराष्ट्रातील घरा-घरामध्ये त्यांनी दिलेल्या योग्य माहितीचे आचरण लोक करत आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य व्यवस्था आणि भारतीय आरोग्य व्यवस्था यासंदर्भात बोलताना ते सांगतात की, भारतीय आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटर वर गेल्याचं चित्र आपण कोरोना काळात पाहिलं आहे. जगात इतर देश आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० ते १५ टक्के रक्कम नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी खर्च करतात... तिथे भारत हा केवळ आपल्या एकूण उत्पन्नाच्या केवळ सव्वा टक्का रक्कम आरोग्य सेवेवर खर्च करतो. खरंतर भारत सोडून जगातल्या अन्य देशात शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर नागरिकांकडून सरकार निवडलं जातं. परंतु दुर्देवाने भारतात राजकीय निवडणुकींच्या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्याला फार महत्त्व दिलं जात नाही परिणामी इतर गोष्टींवर मतदान होतं. जो पर्यंत शिक्षण, आरोग्य राजकीय अजेंडावर येणार नाही तोपर्यंत भारतीय चित्र असेच असेल म्हणायला हरकत नाही. एकंदरित भारतीय आरोग्य व्यवस्था इतर देशांच्या तुलनेत कशी आहे त्याचबरोबर कोरोना काळात डॉक्टरांची काय स्थिती आहे? यासंदर्भात डॉ. संग्राम पाटील यांची ही मुलाखत नक्की पाहा...