Home > Video > तौक्ते वादळ: समुद्राच्या लाटांना भेदून परत आलेल्या वैभवचा संघर्ष...

तौक्ते वादळ: समुद्राच्या लाटांना भेदून परत आलेल्या वैभवचा संघर्ष...

तौक्ते वादळ: समुद्राच्या लाटांना भेदून परत आलेल्या वैभवचा संघर्ष...
X

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले 'तौत्के' हे वादळ आता शांत झालं आहे. या वादळादरम्यानच ONGC च्या तेल क्षेत्राजवळच 'बार्ज'वर (लोकांच्या राहण्यासाठी सपाट जहाजावर केलेली सुविधा) काही माणसं अडकली होती. यातील अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यामधील मुंबईच्या मॅथ्यू असोसीएट या कंपनीत फायरमन म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम करणारा वैभव देखील अडकला होता. मुंबईतून समुद्रापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या ONGC च्या हिरा फिल्डवर नोव्हेंबर 2020 पासून वैभव कार्यरत आहे. त्याच्यासह अनेक सहकारी या प्रकल्पावर कार्यरत होते.

मॅक्समहाराष्ट्र शी बोलतांना त्या चार दिवसांचा थरारक अनुभव वैभव सांगत होता. ONGC फिल्डवरच चार दिवसांचं काम पूर्ण करून मुंबईत परतणार... त्यापूर्वीच तौक्ते वादळाचा संदेश कॅप्टन ला 14 तारखेला मिळाला.

समुद्रातून जहाज तातडीने बाहेर काढण्याच्या सूचना देऊनही ONGC च्या हिरा फिल्ड वरच जहाज थांबले. 15 पासून ते 17 तारखेपर्यंत वादळ आणि लाटा ही प्रचंड वाढल्या. रात्री 10 नंतर मात्र, वादळाने रौद्र रूप धारण केले होते. जहाजात पाणी शिरले होते. लाटांचा वेग इतका होता की, काहीच करता येत नव्हतं जहाजाचे सर्वच्या सर्व आठ नांगर लाटांनी उध्वस्त झाली.

ONGC च्या प्लॅटफॉर्मला जोरात आदळल्याने जहाजाला भगदाड पडलं. जहाजात पाणी वेगाने शिरत होते तसं तसं जहाज बुडत होते. आम्हाला समुद्रात उड्या मारल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. नौदलाकडे कॅप्टन ने अगोदरच मदत मागितली होती. मात्र ती केव्हा मिळते हे माहीत नव्हते.

जहाज बुडू लागल्याने सायंकाळी 5:30 वाजता खवळलेल्या समुद्रात माझ्यासह 300 जणांनी उड्या घेतल्या. लाईफ गार्डच्या साहाय्याने जीव वाचायचा प्रयत्न करत होतो. नौदलाचे जवान वाचवतील या आशेवर होतो.

मात्र, तोपर्यंत जहाजाचा कॅप्टनचं लाईफ गार्ड फाटल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. मोठं मोठया लाटांमध्ये आम्ही खाली दाबले जात होतो. माझे अनेक सहकाऱ्यांच्या डेड बॉडीज माझ्या समोर समुद्रात तर तरंगत होत्या. आता माझीही अशीच तरंगेल असं एक क्षण वाटत होतं. मात्र, आम्ही हिम्मत हारलो नव्हतो. माझं लाईफ गार्ड ही थोडं फाटलं होतं.

मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान नौदलाचे जहाज पोहचले आणि जिवंत राहण्याची थोडीशी आशा जिवंत झाल्या. नौदलाने सुरक्षा जाळी फेकली आणि ती हाताला लागली त्यात मी आणि नाशिक येथील मित्र थोडक्यात वाचलो, पण एका क्षणासाठी धुळे दोंडाईचा येथील योगेश गोसावी हा सहकारी डोळ्यादेखत पाणी खाली दाबला गेला.

नौदलाच्या जहाजावर पोहचल्यावर आमच्या पोटात समुद्राचे पाणी गेल्याने फुगलो होतो. जहाजावरील नौदलाच्या डॉक्टरांनी उपचार केल्याने वाचलो. नौदलाने रेस्क्यू करून 188 जणांचे प्राण वाचवले. नौदल सैनिकांचे आम्ही पाया पडलो, तुमच्या मुळे वाचलो असं सांगत आभार त्यांचे मानले.

जहाजावरील कॅप्टन ने जहाज वेळीच नेलं असतं तर अनेकांचे प्राण वाचले असते. आम्ही तुफान वादळ आणि लाटांमध्ये आठ तास मृत्यूशी झुंज देत होतो. मुंबईच्या समुद्र किनारी पोहचल्यावर आपण वाचलो अशी भावना दाटून आली. पण सहकारी सोडून गेल्याचं मोठं दुःख आहे. ते टाळता आलं असतं आम्ही कॅप्टन ला सांगत होतो. लवकर जहाज न्या. पण कॅप्टन ला ह्या वादळाचा अंदाज आला नाही.

जहाजावरील कॅप्टन चा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी काहीच करू शकत नव्हतो. कॅप्टनच्या अतिआत्मविश्वासनं आमच्या अनेक सहकाऱ्यांचा जीव गेला. वैभव त्या तौक्ते वादळाचा थरारक अनुभव सांगत होता. शेवटी प्रश्न विचारला ह्या वादळातुन सुखरूप घरी आला पुन्हा त्याच कामावर जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर वैभव सांगतो... हो पुन्हा त्याच कामासाठी जाणार... असं उत्तर देत आपल्या देशातील सैन्यदल तर रोज असा सामना करत असतो. मग मी का नाही...?

पाहा तौक्ते वादळाचा थरार, लाटांना भेदून वैभव कसा आला परत...

Updated : 28 May 2021 10:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top