न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात 'या' दोघांना संघाबाहेर करण्याचा सुनील गावस्करांचा सल्ला!
X
मुंबई : T-20 विश्वचषकात पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकल्याने भारतीय संघासाठी वाटचाल थोडी कठीण झाली आहे. आता भारताचा पुढील सामना हा उद्या रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. गावसकर म्हणाले की, भारताला न्यूझीलंडला हरवायचे असेल तर प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील करून घेण्याबाबत गावसकरांनी मत व्यक्त केलं आहे. स्पोर्ट्स तकवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "जर हार्दिक पंड्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण त्याने सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी संघ शार्दुल ठाकूरलाही संधी देऊ शकतो."
पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यातही हार्दिक ११ धावांवर बाद झाला. इशानने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात सलामी करताना ४६ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. त-20 वर्ल्डकपमध्ये भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये दिसत नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध २५ धावा दिल्या. पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे शार्दुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.