चेन्नईने केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं IPL ट्रॉफीवर नाव
X
IPL 2021 Final: आयपीएलचे 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. IPL च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला आहे.
चेन्नईने ठेवलेल्या 193 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. मात्र, 91 धावांवर अय्यर बाद झाला आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. आणि चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर 27 धावांनी सामना जिंकला.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसकेची सलामीवीरांची जोडी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. पण 31 धावा करताच गायकवाडला सुनील नारायणने बाद केलं. पण ऋतुराज बाद झाल्यानंतरही फाफने आपली झुंज कायम ठेवली.
त्याला रॉबीन उथप्पाने साथ दिली. उथप्पाने 15 चेंडूत 3 षटकार ठोकत 31 धावा केल्या. मात्र सुनीलच्या फिरकीच्या जादूवर तो पायचीत झाला. तरीही फाफने आपली खेळी सुरुच ठेवली. शेवटच्या चेंडूवर शिवमने फाफला बाद केले. पण तोवर त्याने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 86 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात त्याला मोईन अलीने नाबाद 37 धावांची साथ दिली. अशाप्रकारे चेन्नईने महत्त्वाच्या सामन्यात केकेआरसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले.
केकेआरने 193 धावांचा पाठलाग अतिशय वेगात सुरु केला होता. दोन्ही सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी अप्रतिम फलंदाजी केली. 10 षटकापर्यंत एकही विकेट गेली नव्हती. अय्यरने तर अर्धशतकही झळकावलं होतं. पण 11 व्या षटकात शार्दूने सेट फलंदाज अय्यरला (50) बाद करत पहिला झटका दिला. त्याच षटकात राणाही शून्यावर बाद झाला. पाहता पाहता संघाचे फलंदाज बाद होत गेले. शुभमन गिलचं (51) अर्धशतक पूर्ण झालं खरं पण तोही लगेचच बाद झाला. अखेरच्या काही षटकात मावी (20) आणि फर्ग्यूसन (18) यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत फार वेळ झाली होती. अखेर चेंडू शिल्लक न राहिल्याने केकेआर 27 धावांनी पराभूत झाला. चेन्नईकडून शार्दूलने 3, जाडेजा आणि हेजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर दीपक आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.