भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट
X
जयपूर : भारत-न्यूझीलंड यांच्यातील उद्यापासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाकडून अतिशय सुमार कामगिरी करण्यात आली. त्यानंतर आता भारतीय संघ पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्यावर भर देणार आहे. विराट कोहलीसह अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा या मालिकेत भारताच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने क्रिकेट चाहत्यांचे या मालिकेकडे लक्ष लागले आहे.
मात्र, मागील आठवड्याभरात जयपूरमधील प्रदूषणाची पातळी वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या शेजारील दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांत हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरला त्याचा फटका बसत आहे. तसेच अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण येत असल्याची माहिती समजते. जयपूरात हवा गुणवत्ता निर्देशांक ३३७ पर्यंत घसरला आहे. दिवाळीच्या काळात हा निर्देशांक ३६४ इतका होता. भारतात मागील दोन आठवड्यातील सर्वात प्रदूषित शहरात जयपूर दुसऱ्या स्थानी आहे.
त्यातच आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार असून जवळपास २५,००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०१३ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे अखेरचा सामना झाला होता. यंदा नियोजनानुसार लढत झाल्यास दवाचा या सामन्यावर प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.