Home > Politics > "तर सरकार जवळ येण्यास हरकत नाही", भाजप - शिंदे गटासोबत युतीबद्दल मनसेचा पुढाकार?

"तर सरकार जवळ येण्यास हरकत नाही", भाजप - शिंदे गटासोबत युतीबद्दल मनसेचा पुढाकार?

तर सरकार जवळ येण्यास हरकत नाही, भाजप - शिंदे गटासोबत युतीबद्दल मनसेचा पुढाकार?
X

मुंबई सह राज्यातील इतर १३ महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे अशी तीन पक्षांची महायुती होणार का अशा चर्चा या नंतर वाढू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा वैयक्तिकरीत्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर काही वेळा राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं आपण पाहिलं.

पण पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. निमित्त होतं शिवाजी पार्क येथे होणाऱ्या मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचं... आता त्यांच्या या भेटीनंतर तर हे तीन पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या प्रश्नाचं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी युतीच्या बाबतीत स्पष्टीकरण देऊन आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथ येथे दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना राजू पाटील म्हणाले की, "राजकारण सोडूनही काही गोष्टी पाहिल्या पाहीजेत. सरकारमध्ये नसलेल्या पक्षाला भाजप आणि शिंदे गट यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत असेल. आमच्या मागण्या मान्य होत असतील. तर अशा सरकारच्या जवळ येण्यास काही हरकत नाही. मागच्या सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हते. एखादी मागणी केली की, तर ती मागणी पूर्ण कशी होणार नाही. याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जातं होते. परंतू आमच्या मागण्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असेल तर जवळीक वाढू शकते."

महानगरपालिकेच्या निवडणूकी दरम्यान किंवा भविष्यात भाजपा-शिंदे गट-मनसे युती होणार का? या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. भाजप - शिंदे गट - मनसेच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या भेटीगाठीबद्दल कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. निवडणूका कोणत्याही असो आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतू युतीबाबत परिस्थीती निर्माण झाली. तर युती करायलाही हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी यांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यासाठी तयार असू.

Updated : 23 Oct 2022 1:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top