मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची फाईल शिवसेना उघडणार का?
X
दादरा नगर हवेलीमध्ये (dadra nagar haveli )लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने (shivsena) भाजपचा (bjp) पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर (mohan delkar )यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (kalaben delkar) यांचा विजय झाल्याने जननेते मोहन डेलकर यांच्यासोबत न्याय केला असल्याची भावना व्यक्त होते आहे. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर इथली जागा रिक्त झाली होती. पण आता या विजयानंतर मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची फाईल शिवसेना उघडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या नेत्यांनी छळ केल्यामुळे डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. तसेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शिवसेना आपल्याला न्याय देईल अशी आशा असल्याने आपण मुंबईत आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी लिहिले होते.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर मुंबईत या प्रकरणी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, काही अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांसह १२ जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी SIT चौकशीची घोषणाही केली होती. पण त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. पण आता परमबीर स्वत:वरील आरोपांमुळे गायब झाले आहेत, तर डेलकर यांच्या पत्नी कलाबेन शिवसेनेच्या खासदार बनल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेना मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची फाईल उघडणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.