Modi मोदींच्या ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सला ‘अदानी’ दिसत नाही का?
X
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी जाब विचारत असून १३ तारखेला मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे, त्यातच जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालून त्यांनाही आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी अदानीचा फुगा लवकर फुटेल अशी भिती व्यक्त केली होती पण मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. विरोधी पक्षांचे मोदी ऐकतच नाहीत. अदानीचा फुगा फुटला आणि जनतेचा पैसा धोक्यात आला, हा पैसा बुडेल अशी भिती वाटते.
काँग्रेस पक्षाने संसदेत अदानी महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली पण मोदी सरकारने या घोटाळ्यावर एक शब्दही काढला नाही. मोदी सरकार भ्रष्ट अदानीला पाठीशी घालत आहे. राज्यात दोन दिवसात माजी मंत्री हसन मुश्रीफ व सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली आहे. मुश्रीफ यांच्यावर तर ईडी तिसऱ्यांदा कारवाई करत आहे परंतु याच ईडीला भाजपाचे भ्रष्ट नेते दिसत नाहीत. विरोधी पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय व आयकर विभागाचा चौकशीचा ससेमीरा लावणारे मोदी सरकार अदानी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? भाजपा सरकार अदानीच्या महाघोटाळ्यावर गप्प बसले असले तरी जनतेच्या हितासाठी काँग्रेसने आवाज उठवला आहे, त्याचाच एक भाग म्हणून राजभवनवर धडक मोर्चा काढला जाणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १३ मार्च रोजी दुपारी ३.०० वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढला जाणार आहे व राजभवनला घेराव घातला जाईल. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष, तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.