गुजरात नंतर भाजप आणखी एका राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याच्या तयारीत?
X
गुजरातमध्ये भाजपचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता हिमाचलमध्ये मुख्यमंत्री बदलणार का? यावर सध्या चर्चा सुरु आहे. कारण पक्ष नेतृत्वाने हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांना दिल्लीत बोलावलं आहे. ते आज दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांना 5 दिवसांच्या आत त्यांना दिल्लीत दुसऱ्यांदा बोलावलं आहे.
आज त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली. या संदर्भात राम ठाकूर यांना माध्यमांनी विचारले असता, ते एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचले असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर राजकारण तापले आहे.
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यामुळं अनेक भाजप शासित राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलले गेले असताना राम ठाकूर यांना देखील राजीनामा द्यावा लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आत्तापर्यंत अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलले आहेत. गेल्या सहा महिन्यांत पक्षाने चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलले आहेत. गुजरातमध्ये विजय रुपाणी व्यतिरिक्त, कर्नाटकात येडियुरप्पा आणि उत्तराखंडमध्ये प्रथम त्रिवेंद्रसिंह रावत आणि नंतर तिरथ सिंह यांची बदली करण्यात आली. आसाममध्येही सर्बानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंत बिस्वा सरमा यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्यंतरी उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वेगळ्या बातम्या येत होत्या. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी त्याच्या भांडणाच्या बातम्याही आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत योगी सरकारच्या कथित गैरव्यवहाराबद्दल टीकाही झाली. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते आणि नंतर प्रकरण मिटवले गेले.
दरम्यान, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावणं झाल्यानंतर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. जय राम ठाकूर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली.. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. कारण पुढील वर्षी हिमाचल विधानसभा निवडणुका आहेत. त्या दृष्टीकोनातून काही बदल केले जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
हिमाचल प्रदेशच्या शेजारील राज्य उत्तराखंड मध्ये भाजपने अलीकडेच मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री बनवले होते, परंतु त्यानंतर काही दिवसात त्यांना राजीनामा द्यायला लाऊन पुष्कर धामी यांच्याकडे राज्याची कमान सोपवली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून एंटी इनकम्बेन्सी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री बदलले जात असल्याचं दिसून येतंय.