महाराष्ट्रातील अशांततेचा वसीम रिझवी मास्टरमाईंड? नवाब मलिक यांनी आरोप केलेले वसीम रझवी कोण?
X
शांततेत असलेल्या महाराष्ट्रात अचानक काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलं आहे. त्रिपुरामध्ये मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात राज्यातील मुस्मीम बांधवांनी बंदचं आवाहन केलं होतं. या बंद दरम्यान राज्यातील काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलं आहे. अमरावतीमध्ये आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना काहींनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या दगडफेक सुरू असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. गर्दी पाहता ग्रामीण भागातूनही शहरात फौजफाटा मागवण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शांत असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अचानक हिंसक घटना का घडत आहेत. असा सवाल निर्माण होणं साहजिक आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वसीम रिझवीवर सवाल उपस्थित केला आहे. त्रिपुरा येथे जी हिंसा झाली. वसीम रिझवी यांनी जे पुस्तक लिहिले आहे. त्याविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. या दरम्यान नांदेड आणि इतर ठिकाणी हिंसा झाली असून या हिंसेचे कठोर शब्दात निंदा करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
वसीम रिझवी हे देशातील वातावरण बिघडेल असे कुठलेही विधाने अथवा लिखाण करणार नाही. याची दक्षता केंद्रसरकारने घ्यावी. असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. वसीम रिझवी हे गेल्या दोन - चार वर्षात या देशातील सलोखा कसा बिघडेल. याबाबतची विधाने करत आहेत. पुस्तके लिहित आहेत. भावना दुखावेल असे कृत्य करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजन पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल. असा प्रयत्न वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरू आहे. असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
वसीम रिझवी हे सिया वक्फ बोर्डाचे चेअरमन असताना त्यांनी गैरव्यवहार केला होता. २०१६-१७ मध्ये युपी पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर सिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. मात्र, ते प्रकरण कोल्ड स्टोरेज मध्ये सीबीआयने ठेवले आहे आणि वसीम रिझवीला वादग्रस्त वक्तव्य करायला मोकळीक देण्यात आल्याने देशातील वातावरण बिघडत आहे त्यामुळे वसीम रिझवीवर तात्काळ कारवाई करा. अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
आंदोलन व निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे. परंतु चुकीच्या पध्दतीने आवाहन करणे. व त्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. हिंसा होणार नाही. ही जबाबदारी आयोजकांची असते. मात्र, काल जे घडले ते योग्य नाही. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. परंतु लोकांनी शांतता ठेवावी. असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
कोण आहे वसीम रझवी?
भारतात मदरशांना बंदी घालावी, त्यामुळे दहशतवादाच्या निर्मितीला चाप लागेल. बाबरी मशीद म्हणजे हिंदुस्थानच्या धरतीवर कलंक या सारखी वादग्रस्त विधान करणारे रझवी 2000 मध्ये समाजवादी पक्षाचे नगरसेवक होते. पुढे त्यांना 2008 मध्ये शिया वक्फ बोर्डाचे सदस्य करण्यात आले. मात्र, या ठिकाणी त्यांनी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर सपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. रझवी हे त्यांच्या धार्मिक वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात.