Home > Politics > मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट कोणासाठी?

मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट कोणासाठी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वर्गवासी आनंद दिघेंबाबत काही गौप्यस्फोट करणार आहेत. हा नेमका गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंसाठी असेल की बाळासाहेब ठाकरेंसाठी असेल असा प्रश्न लेखक सुनील सांगळे यांनी उपस्थित केला आहे..

मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट कोणासाठी?
X

परवा मुख्यमंत्री शिंदे यांनी असे विधान केले की त्यांनी जर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घटना सांगितल्या तर भूकंप होईल. मागे नारायण राणे देखील म्हणाले होते की शिंदे जर वेळेवर बाहेर पडले नसते तर त्यांचा दिघे झाला असता.

सध्या शिंदे दिवसरात्र बाळासाहेबांचे नाव घेत असतात. कोणत्याही भाषणात पाच वाक्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव त्यांनी घेतले नाही असे होतच नाही. मग आता दिघेंच्या बाबत शिंदे कोणाबद्दल बोलत आहेत?

स्व.बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे सुरवातीपासूनच अध्यक्ष होते. अगदी कार्याध्यक्ष म्हटले तरी उद्धव ठाकरे २००३ साली कार्याध्यक्ष झाले होते. आणि शिवसेनेचे अध्यक्ष तर उद्धव ठाकरे हे २३ जानेवारी २०१३ साली झाले. आनंद दिघे यांचे निधन २६ ऑगस्ट २००१ रोजी झाले. अर्थातच जेंव्हा दिघेंचे निधन झाले तेंव्हा शिवसेनेवर नियंत्रण बाळासाहेबांचेच होते. मग दिघेंच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या असतील, त्याला जबाबदार उद्धव ठाकरे तर असू शकत नाहीत. मग शिंदे आता जो भूकंप होईल असा गौप्यस्फोट करणार तो काय बाळासाहेबांच्या बाबत असेल का, ज्यांचे नाव ते उठता बसता घेतात? आणि २१ वर्षांच्या आधी ज्या काही घटना घडल्या असतील त्या जर शिंदेंना माहित होत्या तर ते २१ वर्षे का गप्प बसले? त्यात त्यांचा काय स्वार्थ होता? उद्या समजा शिंदेंनी काही आरोप किंवा सूचक वक्तव्ये केली तर त्यांच्याकडे एवढ्या जुन्या गोष्टींचे काय पुरावे असतील?

याचाच अर्थ असा की त्यांनी सध्या जो नवीन घरोबा केला आहे त्यांचा गुण त्यांना फारच लवकर लागलेला दिसतो. कारण ७५ वर्षांपूर्वीच्या सुभाषबाबूंच्या मृत्युबद्दलच्या किंवा ५५ वर्षांपूर्वीच्या शास्त्रीजींच्या मृत्यूंबाबत अशाच वावड्या त्यांचा सोबती पक्ष कायम उडवीत आला आहे. या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण करायचा आणि नेहरू, इंदिराजी यांच्याकडे संशयाची सुई वळवायचा प्रयत्न करायचा हे धंदे गेली ७० वर्षे सुरु आहेत. त्याच पक्षाची दीक्षा घेऊन आता दिघे प्रकरण त्याच वळणावर नेण्याचा हा प्रयत्न दिसतो. पण यात फार मोठा फरक आहे. उद्या शिंदे यांनी जर असे आरोप केले तर ते आरोप ते ज्यांना दैवत म्हणतात त्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होतील हे लक्षात ठेवावे लागेल.

Updated : 2 Aug 2022 8:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top