अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा मोदींना अल्टिमेटम
X
भाजप खासदार वरुण गांधी यांचं नवीन ट्विट माध्यमांमध्ये पुन्हा चर्चेचा विषय ठरलं आहे. ट्विटरवर कमी सक्रिय असलेल्या वरुण गांधी यांनी गेल्या 40 दिवसात 8 ट्वीट केले आहेत. यातील 8 वे ट्विट दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल विहार वाजपेयी यांच्याशी संबंधित आहे. या ट्विटमध्ये वाजपेयी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भाषण करताना दिसत आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतर अनेक राजकीय पंडित असा अंदाज बांधत आहेत की, वरुण गांधी 17 वर्षांनंतर भाजप सोडू शकतात. दरम्यान, वरुण गांधी यांनी 1980 मधील भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा एक भाग ट्विट केला आहे. ज्यात ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत आहेत. लखीमपूर हिंसाचारादरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे आणि कारवाईची मागणी करणारे ते एकमेव भाजप खासदार आहेत.
दरम्यान, त्यांनी शेतकरी आंदोलनाला दर्शवलेल्या पाठिंब्यानंतर भाजपने त्यांना आणि त्यांची आई मनेका गांधी या दोघांनाही पक्षाच्या कार्यकारी संसदीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखवला.
अलीकडेच, वरुण गांधींनी एक ट्विट केलं होतं. जे मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी इशारा दिला होता की, काही लोकांना लखीमपूर घटनेला हिंदू - शीख लढाई बनवायची आहे. त्यांचा हा इशारा त्यांच्याच पक्षाच्या हायकमांडसाठी असल्याचं मानलं जातं. परंतु, त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचप्रमाणे यावेळीही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यांनी फक्त लिहिलं की –
'उदार नेत्याचे वचन'
दरम्यान, वरुण गांधींनी ट्वीट केलेला अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ 41 वर्ष जुना आहे. ज्यात त्यांना तत्कालीन सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाषण दिलं होतं. मात्र, जर आजच्या संदर्भात हा व्हिडिओ पाहिला तर याचा अर्थ असा होतो की, शेतकरी सरकारला घाबरत नाहीत.
Wise words from a big-hearted leader… pic.twitter.com/xlRtznjFAx
— Varun Gandhi (@varungandhi80) October 14, 2021
वरूण गांधींच्या या ट्विटमधून अनेक अर्थ काढले जात आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की, वरुण गांधींनी भाजपला अल्टिमेटम दिला आहे, की जर सर्व काही ठीक झाले नाही तर ते पक्ष सोडू शकतात. दुसरे म्हणजे, जरी मला कार्यकारी संसदीय समितीमधून हद्दपार केले गेले असले तरी मी घाबरत नाही, मी शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आवाज उठवत राहीन. तिसरा अर्थ असा होऊ शकतो की, मोदी सरकारने शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांना कमकुवत समजू नये. शेतकऱ्यांच्या या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे.
एकूणच या सर्व अंदाजांवरून एकच अर्थ काढला जात आहे की, वरुण गांधींनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून भाजपविरोधातील बिगुल वाजवले आहे. मात्र, त्यांनी अद्यापपर्यंत अधिकृतपणे पक्ष किंवा हायकमांडबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.
त्यामुळे, वरुण गांधी पक्ष सोडतील की पक्षात राहूनच लढा देतील. हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. दरम्यान, वरुण गांधी पक्ष सोडल्यानंतर कोणत्या बाजूला वळतात, हे येणारा काळच सांगेल. दरम्यान, 2019 मध्ये वरुण गांधी यांनी पत्रकारांना सांगितले होते की, जर मी भाजपला राम राम ठोकला तेव्हापासून मी राजकारणातून निवृत्त होईन.
एकूणच, या नवीन ट्विटद्वारे वरुण गांधींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, आता ते गप्प बसणार नाहीत. वरुण गांधींबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवर 'अ रूरल मॅनिफेस्टो' नावाचे पुस्तकही लिहिले आहे.