आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की, संयुक्त राष्ट्रांचे भारताला खडे बोल
X
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटले. तर या प्रकरणानंतर देशात सुरू असलेल्या हिंसाचारावरून संयुक्त राष्ट्रांनी भारताला खडे बोल सुनावले आहेत.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. त्यातच या प्रकरणावरून देशात तीव्र निदर्शने केली जात आहेत. तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून संयुक्त राष्ट्रांनी भारत सरकारला चांगलेच सुनावले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस António Guterres यांचे प्रवक्ते स्टेफाने दुजारिक म्हणाले की, मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या निदर्शनांमध्ये हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धार्मिक मतभेद आणि द्वेषातून उसळलेला हिंसाचार तातडीने थांबवला जावा. तसंच कुठल्याही धर्माविषयी द्वेष पसरवणारे वक्तव्य आणि भाषणं भारत सरकारने तातडीने रोखायला हवेत. तसेच हिंसाचाराच्या प्रकारांना तातडीने आळा घालायला हवा, असं मत संयुक्त राष्ट्रांचे स्टेफाने दुजारिक म्हणाले.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अरबी देशांनी संताप व्यक्त केला होता. तर कतार, पाकिस्तान या देशांनी भारताने माफी मागण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ मुस्लिम देशांची संघटना असलेल्या राष्ट्रांनीही नाराजी व्यक्त केली होती. मात्र यानंतर भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र यानंतरही देशात मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत निदर्शने करण्यात येत आहेत. तर या निदर्शनांदरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून संयुक्त राष्ट्रांनी भारताला खडेबोल सुनावले आहेत.