बंडखोर आमदारांना शिवसेनेचा अल्टिमेटम, ५ वाजेपर्यंतची मुदत
X
पक्षाविरुद्ध बंड केलेल्या आमदारांवर आता शिवसेनेने (40MLAS) कारवाईची तयारी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानी सकाळपासून बैठका घेतल्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक ५ वाजता बोलावण्यात आली आहे. तसेच सर्व बंडखोर आमदारांना पक्षाने मेल करुन ते पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये काय म्हटले आहे ते पाहूया...
विषय: शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सूचना
पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून, २०२२ रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.
सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
असा इशारा या पत्रामध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेचे किती आमदार उपस्थित राहतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.