सस्पेंस संपला, प्रकाश आंबेडकर- उध्दव ठाकरे यांचं ठरलं, आज युतीची घोषणा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवशक्ती- भीमशक्ती (ShivShakti - Bhimshakti) एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Uddhav Thackeray And prakash Ambedkar) हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त मोठी घोषणा करणार आहेत. याबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
X
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चांनीही जोर धरला आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार की नाही? याबाबत अखेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. (Prakash Ambedkar And Uddhav Thackeray)
सुभाष देसाई (Subhash desai) म्हणाले, दोन मोठे पक्ष एकत्र येत असतील तर खूप बारीक सारीक प्रक्रीया पूर्ण कराव्या लागतात. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी लागते. ती चर्चा आता संपली आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमचं मनातून सगळं ठरलं आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमीत्ताने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर याबाबत घोषणा करण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट संकेत सुभाष देसाई यांनी दिले आहेत. याबरोबरच प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे हे ११ वा पत्रकार परिषद घेणार आहेत.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. तसेच महाविकास आघाडीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते अमरावती (Amaravati) येथे बोलत असताना म्हणाले की, माझी बोलणी उध्दव ठाकरे यांच्यासोबत सुरु आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress And NCP) गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं. मी त्यांच्याशी बोलणार नाही. मात्र यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत
काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. कारण एका विशिष्ट विचारधारेविरुध्द लढताना सर्वांनी एकत्र यायला हवं. आमच्यात कुठलाही मानपानाचा प्रश्न नाही. उध्दव ठाकरे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणार आहेत. भाजप विरोधातील लढाईला बळ मिळावे, यासाठी प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत असल्याचे अतुल लोंढे (Atul londhe) म्हणाले.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडूनही स्वागत
जितेंद्र आव्हाड यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावेळी आव्हाड म्हणाले, "मी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील नेता नाही. पण सामाजिक दृष्टीकोनातून मी जेव्हा राजकारणाकडे पाहतो, तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असं मला वाटतं. राज्यात सध्या धर्मांधता, जातीय द्वेष वाढत आहे, अशा काळात प्रकाश आंबेडकरांनी समविचारी पक्षांसोबत जात आहे, असं म्हटलं तरी ते खूप ताकदीचं ठरेल, असं मत आव्हाड यांनी व्यक्त केले.