ठाकरे गटाचे आमदार ठरणार अपात्र?
X
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटापुढे आता अडचणींचा डोंगर उभा राहण्यास सुरुवात झाली आहे. आधी पक्ष आणि पक्ष चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरण्यासाठी कोणतं कारण कारणीभूत ठरू शकतं? जाणून घेण्यासाठी वाचा...
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची ?आणि धनुष्यबाण कुणाचा? हे स्पष्ट केलंय. अखेर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गट चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आणि त्यानंतर बहूमत चाचणीच्या (Floor Test) वेळी विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातच आता निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत निर्णय घेतल्याने 15 शिंदे गट या आमदारांना अपात्र करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे सुध्दा शिवसेनेचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपचे आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेण्यापासून सर्वोच्च न्यायालयही रोखू शकणार नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार आहे.
यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar) यांनी म्हटले आहे की, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना आगामी काळात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) हा पक्ष म्हणूनही निवडणूक आयोग मान्यता देणार नाही. कारण फुटीसाठी आवश्यक सदस्यसंख्या नसल्याने या ठाकरे गटाच्या सदस्यांना एकतर शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सभागृहात बसावं लागेल किंवा अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटासाठी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात, उध्दव ठाकरेंना ( उबाठा ) पक्ष म्हणूनही येत्या काळात निवडणूक आयोग मान्यता देणार नाही. फूटीसाठी आवश्यक सदस्यसंख्या नसल्याने सभागृहात त्यांना शिवसेना म्हणूनच बसावं लागेल, किंवा अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. परिस्थिती गंभीर होणार आहे.
— Ravindra Ambekar (@RavindraAmbekar) February 18, 2023
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची आमदारकी वाचणार?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बहुमताच्या चाचणीवेळी विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्यास आदित्य ठाकरे यांची आमदारकी वाचू शकते.
आमदारकी वाचवण्यासाठी काय आहे पर्याय?
शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्याने ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र त्यांनी सभागृहात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केल्यास निवडणूकीपर्यंत आमदारकी वाचू शकते, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. याबरोबरच ठाकरे गटाच्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचाही पर्याय त्यांच्याकडे असेल.