Mukul Roy Missing : माजी रेल्वेमंत्री मुकूल रॉय बेपत्ता
माजी रेल्वे मंत्री मुकूल रॉय (Mukul Roy) बेपत्ता असल्याची माहिती त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय याने दिली आहे. मुकूल रॉय यांच्याशी सोमवारी सायंकाळपासून संपर्क होत नसल्याचंही त्याने सांगितलं.
X
Mukul Roy Missing : तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री मुकूल रॉय (Mukul Roy) हे बेपत्ता झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय याने वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे.
"माझा अजूनही माझ्या वडिलांशी संपर्क झाला नाही, ते अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत" अशी माहिती तृणमूल कॉंग्रेसचे नेते शुभ्रांशू रॉय यांनी दिली आहे. रॉय यांच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार, मुकुल रॉय हे दिल्लीत एका नियोजित बैठकीसाठी सोमवारी संध्याकाळी विमानानं दिल्लीला जाणार होते. सध्या तरी आम्ही हेच सांगू शकतो की, मुकुल रॉय हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्ली विमानतळावर रात्री ९ च्या सुमारास पोहोचले असतील, मात्र अजूनही त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितलं.
तृणमूल कॉंग्रेस (Trinamul Congress) पक्षात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून मुकुल रॉय यांची ओळख आहे. मात्र, पक्षांतर्गत वादातून त्यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती.
मुकुल रॉय यांनी 2021 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. मात्र, निवडणूकीचे निकाल घोषित होताच ते पुन्हा तृणमूल कॉंग्रेसमध्ये परतले.