भाजपचे साडेतीन लोक लवकरच कोठडीत : संजय राऊत
भाजपचे साडेतीन लोक जाणार अनिल देशमुखांच्या कोठडीत, संजय राऊतांचा इशारा
X
गेल्या काही दिवसात महाविकास आघाडी विरुध्द भाजप वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना भाजपचे साडेतीन लोक लवकरच कोठडीत जातील, असे विधान केले आहे. संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेवर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि ठाकरे परीवारावर जी चिखलफेक सुरू आहे, त्या मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले जाईल. तर राऊत पुढे म्हणाले की, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, असे भाजपाचे नेते सांगत आहेत. मात्र भाजपचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील तर मात्र त्यावेळी अनिल देशमुख कोठडीबाहेर असतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात सरकार आहे आणि ते शिवसेनेच्या नेतृत्वात आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच सरकार हे सरकार असते. त्यामुळे पाहुयात कोणात किती दम आहे. कारण हमाम मे सब नंगे होते है, असे विधान संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत म्हणाले की, भाजपचे नेते शिवसेनेच्या मंत्र्यांना धमकावत आहेत की अनिल देशमुखांच्या कोठडीत हा मंत्री जाईल, तो मंत्री जाईल, अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे भाजपच्या साडेतीन लोकांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि लवकरच भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. तर आतापर्यंत 'बर्दाश्त केले आता बरबाद करणार' असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
मंगळवारी शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकारी एकत्रितपणे शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर, ठाकरे कुटूंबियांवर जे आरोप केले जातात, त्या आरोपांना आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराला पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांविरोधात आक्रमक होत टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव आवाज काढून चिडवले होते. त्यानंतर त्यांना संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते जामीनावर आहेत.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी पुणे शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसचे सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे मित्र असल्याचे सांगत त्यांनी जंबो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. तर ठाणे येथे बोलत असताना ठाकरे सरकार मंत्री अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये कधी पाठवणार, असा सवाल केला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी भाजपच्या कोणत्या नेत्याला इशारा दिला आहे, याची स्पष्टता नसली तरी त्यांच्या बोलण्याचा रोख किरीट सोमय्या आणि राणे पिता पुत्रांवर असल्याची चर्चा सुरू आहे.