भाजप सोडणाऱ्या नेत्याविरोधात दुसऱ्याच दिवशी अटक वॉरंट
X
उत्तर प्रदेशात निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सपामध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी प्रसाद मौर्य यांना दुसऱ्याच दिवशी एका जुन्या प्रकरणात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
२०१४मधील एका प्रलंबित प्रकरणात मौर्य यांच्याविरोधात सुलतानपूर कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी त्यांना २४ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. २०१४मध्ये स्वामी प्रसाद मौर्य हे बसपाचे महासचिव आणि विरोधी पक्षनेते देखील होते. या काळात मौर्य यांनी देवांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर सात वर्षांपूर्वी मौर्य यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच खटल्यात कोर्टात हजर राहिले नाही म्हणून कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे जुने प्रकरण असून याआधीही मौर्य यांच्याविरोधात वॉरंट जारी झाले होते. पण त्यांनी मौर्य यांनी हायकोर्टामधून यावर स्थगिती मिळवली होती. याच प्रकरणात ६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने त्यांना १२ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण बुधवारी ते हजर झाले नाहीत आणि कोर्टाने वॉरंट जारी केले.