सुप्रिया सुळेंची 'ED सरकार' वर टिका...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील ईडी सरकारवर तोफ डागली. अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले उद्योग आणि रोजगार पळवले. आता आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घालताय का? असा थेट सवालच सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
X
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हेलेंटाईन डे च्या दिवशी रात्री आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन राज्यातील ईडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, घटनाबाह्य ईडी सरकार आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथे तुमची सर्व सोय अदृष्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही त्या बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही. अशा शेलक्या शब्दात सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर तोफ डागली.
घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.@mieknathshinde @Dev_Fadnavis
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
भारतातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. आणि तशी जहीरात आसामच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन राज्यातील ईडी सरकारला जाब विचारला आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग पुण्यातील भिमाशंकर येथे आहे हे अनेक वर्षापासून आपण सर्वांना माहित आहे. पण आता हा नवा वाद उकरून काढण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पोमोही येथील शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरु केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार असल्याची टिका सुळे यांनी केली आहे.
श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे, अन्य कोणतेही सहावे ज्योतिर्लिग नाही. यापेक्षा वेगळा काय तो पुरावा हवा आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
आता आणखी कुणाची साक्ष हवी ?
तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय. असे सुद्धा ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारत, वस्तूस्थिती माहिती द्यावी, अशी विनंती सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.