Home > Politics > चंद्रकांत पाटील यांना समज

चंद्रकांत पाटील यांना समज

चंद्रकांत पाटील यांना समज
X

`राजकारण सोडा आणि स्वयंपाक करा, असं वक्तव्य करुन रोष ओढून घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत दादा पाटील यांनीआता माफी मागितल्यानंतर यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्याचे राज्य महीला आयोगानं म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी OBC आरक्षणासाठी केलेल्या उपोषणामध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. आरक्षण देता येत नसेल तर घरी बसा, जेवण करा, दिल्लीत जा नाही तर मसणात जा पण आम्हाला आरक्षण द्या अशा पद्धतीचं विधान त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना केलं होतं.

त्यांच्या या विधानावर राज्यभरातील महिलांनी आक्रोश केला होता. महाविकास आघाडीतील प्रत्येक महिला नेत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर थेट राज्य महिला आयोगानेच चंद्रकांत पाटील यांना सदर प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले होते.

महिला आयोगाच्या या आदेशानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना एक पत्र लिहुन खुलासा केला आहे. आपल्या पत्रात महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत.

मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं होतं.

त्यावर महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज दिली आहे.


Updated : 29 May 2022 6:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top