काँग्रेसशासित राज्यांत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी सोनिया गांधींनी हस्तक्षेप करावा- भाजप
X
नवी दिल्ली : देशातील काँग्रेसशासित राज्यांत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी आता सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी ही मागणी केली. महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वात जास्त कर लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारनेही कर कमी करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यानंतर अनेक राज्यांनी देखील आपले स्थानिक कर कमी केलेत. याचा फटका काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे. पंजाब मधील पेट्रोल पंप मालक सध्या चिंतेत आहेत पंजाबपेक्षा चंदीगडमध्ये पेट्रोल 11 रुपये 64 पैसे, हिमाचल प्रदेशात 11 रुपये 57 पैसे तर हरियानामध्ये 10 रुपये 60 पैसे स्वस्त झाल्याने अनेक वाहनधारक या राज्यांमध्ये जाऊन पेट्रोल भरत असल्याने पंजाब राज्यातील पेट्रोल पंपधारक चिंतेत सापडले आहेत. यामुळे पंजाब सरकार कर कमी करणार का, याकडे पेट्रोल पंपचालकांच लक्ष लागलं आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता भाजप नेत्यांनी बिगरभाजप राज्यांतील सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील सरकारनेही इंधनावरील कर कमी केला पाहिजे, असा मुद्दा भाजप नेत्यांकडून चर्चेत आणला जात आहे.