Home > Politics > sidhu vs captain: पंजाब कॉंग्रेसमधील वादळ पक्ष नेतृत्व शांत कसं करणार?

sidhu vs captain: पंजाब कॉंग्रेसमधील वादळ पक्ष नेतृत्व शांत कसं करणार?

sidhu vs captain: पंजाब कॉंग्रेसमधील वादळ पक्ष नेतृत्व शांत कसं करणार?
X

सध्या पंजाब आणि काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्याचे कॉंग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीनंतर रावत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत अंतिम निर्णय घेतील. सोनिया गांधी आणि हरीश रावत यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये नवज्योतसिंग सिद्धूही उपस्थित होते.

काँग्रेस हाय कमांडला पंजाबमधील कॅप्टन अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू हा वाद मिटवणं सोप्प नाही. मात्र, हरीश रावत यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर केलेल्या विधानानंतर कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी स्पष्टपणे समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी कॅप्टन आणि सिद्धू यांनी त्यांच्या समर्थकांसह बैठक घेतली. तर इकडे संध्याकाळपर्यंत हरीश रावत यांचं या संदर्भात स्पष्टीकरणही समोर आलं.

रावत म्हणाले की, सिद्धू हे पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष असतील असं त्यांनी म्हटलेलं नाही तर ते असं म्हणाले होते की "हा प्रश्न सोडवण्याचं सूत्र या संदर्भातच काहीतरी असेल." रावत यांनी गुरुवारी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

कॅप्टनचा हाय कमांडला फोन

हरीश रावत यांच्या विधानानंतर पंजाबमध्ये वाढलेल्या राजकीय तापमानाची झळ दिल्लीतही पोहोचली. रिपोर्ट्सनुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत हाय कमांडला फोन केला होता. सिद्धू यांना अध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेतल्यास तो त्यांना मान्य नसेल. सिद्धू हे केवळ साडेचार वर्षांपासून पक्षात आहेत. मात्र, अनेक वरिष्ठ नेते पक्षात असल्याने सिद्धूंना या मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही. असं या अगोदरही अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होत.

दरम्यान सिद्धू यांनी बोलावलेल्या बैठकीत चार मंत्री आणि सहा आमदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. तर इकडे कॅप्टनने सुद्धा आपले समर्थक असलेले अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांशी भेट घेतली. सात महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी होणार हा वाढता कलह राज्यातील काँग्रेस पक्षासाठी एक वाईट संकेत आहे.

राजीनाम्याविषयी अफवा

कॅप्टनच्या नाराजीची बातमी इतक्या टोकापर्यंत पोहोचली की त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान कॅप्टनचे माध्यम सल्लागार रवनीत थुक्रल यांनी ट्विट केलं की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि २०२२ च्या निवडणुकांमध्ये ते २०१७ च्या निवडणुकांप्रमाणेच काँग्रेसचे नेतृत्व करतील.

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष घोषित करण्यास हाय कमांडने मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे, परंतु कॅप्टनच्या नाराजीनंतर त्यांना हात मागे घ्यावे लागत आहेत. पंजाब कॉंग्रेसमध्ये सुरु असलेला हा संघर्ष संपवण्यासाठी हरीश रावत हे गेल्या अनेक दिवसांपासून हाय कमांडशी चर्चा करत आहेत. त्याअगोदर सिद्धू यांनी राहुल आणि प्रियांकाची भेट सुद्धा घेतली होती आणि त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही दिल्लीत येऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली.

दरम्यान अमरिंदरसिंग यांच्या जवळील व्यक्तींनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सिद्धू यांना अध्यक्ष बनवल्याने पंजाबच्या कॉंग्रेस मध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आणि पक्ष तुटू शकतो.

तसेच पंजाब काँग्रेसमध्ये सलोख्याच्या ज्या सूत्राबद्दल चर्चा केली जात आहे, त्यानुसार सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याव्यतिरिक्त दोन कार्यकारी अध्यक्ष बनवले जातील. आणि हे दोघेही कॅप्टनच्या निवडीचे असतील. याशिवाय कॅप्टनच्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश केला जाऊ शकतो तर काही जुन्या चेहऱ्यांना सुट्टी सुद्धा मिळू शकते.

या सगळ्यात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकांआगोदरही अशाचप्रकारच्या अडचणी समोर आल्या होत्या. आणि काँग्रेस हाय कमांडला अमरिंदर सिंह यांचं ऐकावं लागलं होतं. मात्र, यावेळी काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 16 July 2021 3:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top