उध्दव ठाकरे यांच्या गटाचे चिन्ह ठरले?
X
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवल्यामुळे दोन्ही गटाने नवे चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी चाचपणी सुरु केली आहे. दरम्यान उध्दव ठाकरे यांच्या गटाने ठरवलेले नाव आणि चिन्ह समोर आले आहे.
एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही गटांना नवे चिन्ह आणि पक्षाचे नवे नाव सुचवण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या गटाने संभाव्य पक्षाच्या नावांची यादी आणि संभाव्य निवडणूक चिन्ह ठरवल्याचे समोर आले आहे.
उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांच्या यादींच्या व्यतिरीक्त चिन्ह निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. यामध्ये आमच्या पक्षाच्या विचारधारेशी वाहन, शिलाई मशिन किंवा इतर चिन्ह जुळत नाहीत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचा गट हिंदूत्ववादी विचारधारेशी जुळणारे त्रिशुळ, मशाल आणि उगवता सुर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत चिन्ह आणि पक्षाचे नाव सादर करण्यास वेळ दिला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना गोठवण्यात आल्यानंतर आपल्या पक्षासाठी तीन संभाव्य नावे दिले आहेत. त्यामध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे) आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या नावांची संभावित यादी दिली आहे. त्यामुळे सोमवारी निवडणूक आयोग ठाकरे गटाला कोणते चिन्ह आणि पक्षासाठी कोणते नाव देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.