आगे आगे देखो होता है क्या? शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांचं सूचक वक्तव्य
शिवसेना आमदारांपाठोपाठ खासदारही बंड करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वा यांनी सूकक वक्तव्य केले आहे.
X
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. तर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेनेची निष्ठा यात्रा काढली होती. दरम्यान शिवसेनेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून आमदारांपाठोपाठ खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पद स्वीकारले. तर आता शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यावरून शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
आशिष जैस्वाल म्हणाले की, खासदारांची अवस्था आमदारांपेक्षा वाईट होती. त्यामुळे आमदारांच्या आधी खासदार बंड करतील अशी अपेक्षा होती. मात्र आधी आमदारांनीच बंड केले. मात्र लवकरच खासदारही बंड करतील असं सूचक वक्तव्य केले.
तसेच पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना केंद्रातील मंत्रीपद सोडावे लागले. याबरोबरच युती सरकार झाले असते तर 50 टक्के मंत्रीपदं मिळाली असती. मात्र ती संख्या महाविकास आघाडीमुळे एक तृतियांश संख्येवर आली. या सगळ्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळे यापुढेही आमदारांसारखाच निर्णय खासदारही घेतील असं म्हणत आगे आगे देखो होता है तो क्या? असा सूचक इशारा आशिष जैस्वाल यांनी दिला.
पुढे संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना जैस्वाल म्हणाले की, संजय राऊत बोलबच्चन आहेत. त्यांनी एखाद्या निवडणूकीत उभे राहून निवडून येऊन दाखवावे. ज्यांना जनतेतून निवडून येता येत नाही त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला टोमणे मारणे याला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचे जैस्वाल म्हणाले.
संजय राऊत यांच्या तोंडावर कोणाचंच नियंत्रण नाही. तर उध्दव ठाकरे हे सुध्दा संजय राऊत यांच्या तोंडावर नियंत्रण ठेऊ शकत नसल्याचे वक्तव्य आशिष जैस्वाल यांनी केले आहे.