रामदास कदमांचा आपल्याच पक्षावर प्रहार
X
मुंबई : शिवसेनेचे नाराज असलेले नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पक्षाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेमध्ये सहभागी होत रामदास कदम यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहेय. खेड शहराचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, पण त्यांना पोलीस अभय देत आहेत आणि पोलिसांवर एका राजकीय पक्षाचा दबाव आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांवर जोरदार टीका केली.
रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. तर शुक्रवारी पुरवणी मागण्यावरील चर्चेत रामदास कदम यांनी नगरविकास खाते वैभव खेडे यांच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगत गंभीर आरोप केले. कोणत्या नेत्याचा त्यांच्यावर दबाव आहे हे आपल्याला माहिती आहे, असे सांगत त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे.
रामदास कदम यांचा आरोप काय?
रामदास कदम यांच्या आरोपानुसार, वैभव खेडेकर यांनी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून बौध्दवाडीच्या पुलासाठी 20 लाख रूपये मंजुर करून घेतले. परंतू वैभव खेडेकर याने जिथे बौध्दवाडीच नाही त्या ठिकाणी खासगी इमारत बांधली. त्या इमारतीत खेडेकर यांच्या पत्नीच्या नावे 4 फ्लॅट आहेत. त्या इमारतीत जाण्यासाठी वैभव खेडेकर यांनी समाजकल्याण विभागामार्फत पुलासाठी 20 लाख रूपये निधी खर्च केला. हा समाजकल्याण विभागाच्या पैशांचा अपहार आहे, असे आरोप कदम यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत वैभव खेडेकर हे दोषी आढळून आले आहेत. तरीही वैभव खेडेकर यांना गृह विभागाने पोलिस संरक्षण दिले आहे. त्यावरून कारवाई करण्याचे सोडून खेडेकर यांना पोलीस संरक्षण का दिले जात आहे, त्यांच्यावर दबाव आहे का, असा प्रश्न गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना विचारला. आपण प्रस्ताव दिलेला असतानाही एका आरोपीला पोलिस संरक्षण दिले जात आहे, आपली एवढीही किंमत आता उरली नाहीये का, असा सवालही त्यांनी विचारला.